मालधक्का रोडवर शस्त्रविक्रीचा प्रयत्न उधळला

गावठी कट्ट्यासह दोघे जेरबंद

सिडको : प्रतिनिधी
नाशिकरोडमधील मालधक्का रोड परिसरात बेकायदेशीर शस्त्राच्या व्यवहारावर गुंडाविरोधी पथकाने मध्यरात्री धडक कारवाई करत गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, शस्त्र व्यवहाराशी संबंधित पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, शनिवारी (4 जुलै) पहाटे सुमारे 1.33 वाजता मालधक्का रोडवरील एचपी गॅस गोडावूनलगतच्या मोकळ्या जागेत काही तरुण संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती गुंडाविरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलीस शिपाई राकेश राऊत व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी धाड टाकून कारवाई केली.
तपासादरम्यान गोविंदा संजय साबळे (रा. भोरमळा, ओढा रोड) हा सिद्धांत सचिन धनेधर (रा. चव्हाण मळा, जय भवानी रोड), सोहिल फिरोज शेख (रा. रेल्वे कॉलनी, सिन्नर फाटा) आणि अनिकेत उर्फ केरला यांच्याकडे गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन आल्याचे उघड झाले. अंगझडतीमध्ये 40 हजार रुपये किमतीचा स्टील बॉडीचा देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे असा एकूण 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत हा कट्टा मनोज डोगळे याच्याकडून विकत घेतल्याची माहिती गोविंदा साबळे याने पोलिसांना दिली. त्यानुसार गोविंदा साबळे, सिद्धांत धनेधर, सोहिल शेख, अनिकेत उर्फ केरला आणि मनोज डोगळे या पाच जणांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार भामरे पुढील तपास करीत आहेत.

Attempt to sell weapons on Maldhakka Road foiled.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *