निवडणुका डोळ्यासमोर ठेवून धार्मिक दुही माजवण्याचा प्रयत्न

पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजपावर आरोप
नाशिक : प्रतिनिधी
आगामी लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्रातील मोदी सरकार देशात धार्मिक दुही माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामाध्यमातून सत्तेची पोळी भाजण्याचा डाव भाजपाने आखला आहे. असा घणाघात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
नाशिकमध्ये के.के. वाघ महाविद्यालयातर्फे आयोजित स्मृति व्याख्यानाच्या कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या देशात पुन्हा भाजपचे सरकार आल्यास लोकशाहीचा गळा घोटल्याशिवाय राहणार नसल्याचे सांगत भाजपला रोखण्यासाठी समविचारी पक्षांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली एकत्र येणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. येथील कॉंग्रेस भवनात पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना कॉंग्रेसच्या एकूणच भूमिका मांडली. राजस्थानातील जयपूर येथे झालेल्या कॉंग्रेसच्या देशव्यापी चिंतन शिबिरातील घडामोडींचा परामर्श घेताना राज्यातही 2 जून रोजी काही ठिकाणी शिबिरे घेण्यात आल्याचे सांगितले.
पक्षाला पुन्हा नवचैतन्य प्राप्त करून देण्यासाठी सध्या देशपातळीवर पूर्ण वेळ अध्यक्ष, चिंतन शिबिर आणि संघयनात्मक निवडणूक यावर चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले. भाजपला रोखणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित करताना त्यासाठी देशभरात पाळेमुळे रुजलेल्या कॉंगे्रस पक्षाच्या नेतृत्वाखाली देशातील सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे सांगितले. प्रादेशिक पक्षांनी कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या विरोधात एकत्र आल्यास मोदींना आणि भाजपाला रोखणे शक्य होईल, असेही चव्हाण म्हणाले. यावेळी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, शोभा बच्छाव यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *