अपघात टाळण्यासाठी धोकादायक झाडांंचे ऑडिट

‘उद्यान’कडून सहा पथकांची नियुक्ती

नाशिक : प्रतिनिधी
गेल्या दोन-तीन दिवसांत राज्यातील विविध भागांत झाडे कोसळून अपघात झाले. यात काहींचा मृत्यू तर काहीजण जखमी झाले. दरम्यान, नाशिक शहरात असे प्रकार घडू नये याकरिता महापालिकेच्या उद्यान विभागाने खबरदारी घेतली असून, शहरातील धोकेदायक झाडांचे ऑडिट केले जाणार आहे. याकरिता सहा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, पंचवटी, सातपूर, नवीन नाशिक आणि नाशिकरोड या सहा विभागांसाठी स्वतंत्र सहा पथके नियुक्त केली आहेत. ही पथके आपल्या कार्यक्षेत्रातील धोकादायक झाडे, वाळलेल्या किंवा कोसळण्याची शक्यता असलेल्या झाडांसह फांद्यांची पाहणी करून आठ दिवसांत सविस्तर अहवाल सादर करणार आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर धोकादायक फांद्यांची छाटणी, आवश्यक ठिकाणी झाडे हटविणे तसेच इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने राबविण्यात येणार असल्याची माहिती उद्यान विभागाकडून देण्यात आली. पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मुंबईसह काही उपनगरांमध्ये धोकादायक झाडांच्या फांद्या कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक मनपानेही खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील धोकादायक झाडे व फांद्यांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. उद्यान विभागामार्फत धोकादायक झाडांच्या फांद्यांचे ऑडिट सुरू करण्यात
आले आहे.

पावसाळ्याच्या पार्शभूमीवर धोकादायक झाडांची माहिती घेतली जाणार आहे. रस्त्याच्या बाजूला असलेली झाडे पडण्याची शक्यता असते. अशी झाडे शोधून धोकादायक फांद्या तोडल्या जाणार आहेत. नागरिकांनीदेखील पालिकेला सहकार्य करून धोकादायक झाडे किंवा फांद्यांची माहिती द्यावी. यासंदर्भात आठ दिवसांत अहवाल प्राप्त होताच आवश्यक ती कारवाई करण्यात येईल.
-विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक

Audit of dangerous trees to prevent accidents

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *