आठ तालुक्यांत गतवर्षाच्या तुलनेत घट, इगतपुरीत सर्वाधिक तूट
नाशिक : प्रतिनिधी
खरीप हंगामातील पावसाची तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्य शासनाने नाशिक जिल्ह्यातील दहा तालुक्यांत ट्रिगर-1 लागू केला आहे. 28 सप्टेंबरपर्यंतच्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीत या तालुक्यांपैकी बहुतांश भागांत सरासरीच्या तुलनेत पावसाची तूट कायम आहे. दहापैकी आठ तालुक्यांत गतवर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत पाऊसही कमी झाल्याचे दिसते.
इगतपुरीत जूनपासून 1,265.5 मिमी पाऊस झाला आहे. तालुक्याची सरासरी 3,029.8 मिमी असल्याने प्रत्यक्ष पर्जन्यमान सरासरीच्या केवळ 41.8 टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत 1,996.4 मिमी पाऊस झाला होता. म्हणजेच यंदा गतवर्षाच्या तुलनेत सुमारे 731 मिमी कमी पाऊस झाला आहे.
येवला, नांदगाव आणि मालेगावची स्थितीही गंभीर आहे. येवल्यात यंदा 240.2 मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या 54 टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत 573.1 मिमी पाऊस झाला होता. नांदगावात यंदा 282.8 मिमी, तर गतवर्षी 642.1 मिमी पाऊस झाला.
मालेगावात यंदा 272.8 मिमीच्या तुलनेत गतवर्षी 591.1 मिमी पाऊस झाला होता. पेठमध्ये यंदा 1,350.7 मिमी पाऊस झाला असून, तो सरासरीच्या 66.8 टक्के आहे. गतवर्षी याच कालावधीत 1,870.9 मिमी पाऊस झाला होता. सिन्नरला यंदा 391.6 मिमी, तर गतवर्षी 523.2 मिमी पाऊस झाला. देवळ्यात यंदा 334.6 मिमीच्या तुलनेत गतवर्षी 375.8 मिमी पाऊस झाला आहे. बागलाणमध्ये यंदा 444.7 मिमी पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत तो 92.9 टक्के आहे. मात्र, गतवर्षी 482.8 मिमी पाऊस झाला. त्यामुळे येथेही यंदा घट नोंदली आहे.
जिल्ह्यात पावसाची 30 टक्के तूट
28 सप्टेंबरपर्यंत नाशिक जिल्ह्यात जून ते सप्टेंबरदरम्यान सरासरी 933.8 मिमी पाऊस अपेक्षित असताना, प्रत्यक्षात सुमारे 652.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे 30.2 टक्के पावसाची तूट आहे. गतवर्षी याच कालावधीत 800.8 मिमी पाऊस झाला होता. यंदाचा पाऊस गतवर्षाच्या तुलनेतही कमी आहे.
कळवण, सुरगाण्यात गतवर्षापेक्षा अधिक पाऊस
दुष्काळी यादीतील कळवण आणि सुरगाणा या दोन तालुक्यांत मात्र गतवर्षाच्या तुलनेत यंदा अधिक पाऊस झाला आहे. कळवणमध्ये यंदा 567.1 मिमी पाऊस झाला. गतवर्षी 505.5 मिमी होता. सुरगाण्यात यंदा 1,540.4 मिमी, तर गतवर्षी 1,364.8 मिमी पाऊस झाला होता. मात्र, दुष्काळ जाहीर करताना केवळ गतवर्षाच्या तुलनेतील पाऊस नव्हे, तर पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी घटकांचा विचार करण्यात आला आहे.
गतवर्षाच्या तुलनेत पाऊस कमी
इगतपुरी : 1,265.5 मिमी, गतवर्षी 1,996.4 मिमी
पेठ : 1,350.7 मिमी, गतवर्षी 1,870.9 मिमी
येवला : 240.2 मिमी, गतवर्षी 573.1 मिमी
नांदगाव : 282.8 मिमी, गतवर्षी 642.1 मिमी
मालेगाव : 272.8 मिमी, गतवर्षी 591.1 मिमी
सिन्नर : 391.6 मिमी, गतवर्षी 523.2 मिमी
देवळा : 334.6 मिमी, गतवर्षी 375.8 मिमी
बागलाण : 444.7 मिमी, गतवर्षी 482.8 मिमी
Average rainfall has also dropped in the ten drought-affected talukas.