नाशिक : प्रतिनिधी
शब्दातून जेवढे व्यक्त होता येते त्याहून अधिक चित्रातून व्यक्त होता येते.एखाद्या घटनेवर चित्रातून व्यक्त होत असताना त्या घटनेकडे तिरकस नजरेने पाहत मार्मिकपणे व्यंगचित्रातून भाष्य करण्यात येते. व्यंगचित्रातून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक घडामोडीवर भाष्य करणारे व्यंगचित्रकार अवि जाधव यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्राचे प्रदर्शन जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त चोपडा लॉन्स येथे उद्या दिनांक 5 रोजी आयोजित करण्यात आले आहे. या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उदघाटन सकाळी 10 वाजता सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री स्मिता प्रभू यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अवि जाधव यांची व्यंगचित्रे अनेक वर्षापासून दैनिक गांवकरीत आरसा सदराखाली प्रकाशित होतात. या उदघाटनास प्रमुख अतिथी म्हणून माजी महापौर अशोक दिवे, निवृत्त दारुबंदी अधिकारी गं.पां. माने उपस्थित राहणार आहेत. दिवसभर चालणार्या या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाला नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहून प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन व्यंगचित्रकार अवि जाधव यांनी केले आहे.