अंगणवाडी सेविकांचे बँक खाते होल्ड

बँक ऑफ महाराष्ट्राच्या अजब प्रकारामुळे उपासमारीची वेळ

दिंडोरी ः प्रतिनिधी

दिंडोरी एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत मानधनावर काम करणार्‍या अनेक अंगणवाडी सेविका व कर्मचार्‍यांचे नोव्हेंबर 2021 पासून मानधन खात्यात जमा झाले नसून, काहींचे बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमधील खाते
न सांगता लॉक व होल्डवर ठेवण्यात आले आहे. मानधन खात्यावर जमा होऊन परत गेले असून, या अजब प्रकारामुळे सेविका व कर्मचार्‍यांवर उपासमारीची वेळ आली असून, भीतीचे वातावरण पसरले आहे.
दिंडोरी एकात्मिक बालविकास प्रकल्प योजनेंतर्गत काम करणार्‍या काही अंगणवाडी सेविका व कर्मचार्‍यांचे खाते बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये आहेत. परंतु नोव्हेंबर 2021 पासून बँक ऑफ महाराष्ट्र बँकेमध्ये असलेल्या खात्यातील अंगणवाडी सेविका, कर्मचार्‍यांचे मानधन खात्यात जमा होत नाही. तर अनेक सेविकांचे बँक खाते लॉक व होल्डवर ठेवण्यात आले आहे.
नोव्हेंबर 2021 पासून अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मानधन खात्यात जमा होत नाही. नोव्हेंबर 2021 पासून काही अंगणवाडी कर्मचार्‍यांचे दरमहा असलेल्या नियमित मानधनापेक्षा कमी मानधन जमा होत आहेत.
काही अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या खात्यात पैसे जमा होऊन परत गेलेले आहे. काही अंगणवाडी कर्मचार्‍यांचे खाते लॉक किंवा होल्ड दाखवल्यामुळे, त्यांना त्यांचे मानधन जमा झाले की नाही, हेसुद्धा कळत नाही. या अजब प्रकारामुळे दिंडोरी तालुक्यातील अंगणवाडी सेविका व कर्मचार्‍यांच्या मनात एकप्रकारची भीती व धास्ती निर्माण झाली आहे.
याबाबत संबंधित विभागाच्या वतीने त्वरित दखल घेऊन, सुधारणा करून बँक ऑफ महाराष्ट्रात असलेल्या अंगणवाडी कर्मचारी या खातेदाराचे मानधन विनाविलंब नियमित करण्यात यावे, अशी मागणी ग्रामीण भागातील सेविका व कर्मचारी वर्गाकडून होत आहे.

कर्मचार्‍यांचे आर्थिक हाल
संबंधित बालविकास प्रकल्प विभागाशी संपर्क साधला असता, बँक ऑफ महाराष्ट्रसंदर्भात संपूर्ण राज्यात समस्या उद्भवली असून, याबाबत सविस्तर माहिती घेऊन वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करून, शासनस्तरावर मार्ग काढला जाईल, असे सांगण्यात आले. या सावळागोंधळात मानधनावर काम करणार्‍या सेविका व कर्मचार्‍यांचे आर्थिक हाल होत आहेत.

हे ही वाचा :मनसे कार्यकर्त्यांची धरपकड

गोरगरीबांची मदत करीत ईद-उल-फित्रचा सण अमाप उत्साहात 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *