निर्णय

पुष्पा गोटखिंडीकर

इथून पुढे माझ्या लग्नाच्या भानगडीत तुम्ही दखल घ्यायचं काही कारण नाही, माझं मी बघीन, नीताने निक्षून सांगितले. माझं मी बघेन म्हणजे काय? काय विचार आहे तुझा? मुलीच्या जातीला असा त्रागा करून चालणार नाही. थोडीफार तडजोड करावी लागते गं बाळा, आईने नीताला समजवण्याचा प्रयत्न केला.
ते मुलीला दाखविणे, कांदे-पोहे पद्धतीने लग्न जमविणे मला बिलकूल मान्य नाही. झालं हे खूप झाले.आता मात्र बस! असेल नशिबात तर होईल लग्न नाहीतर कायमची अविवाहित राहीन मी. पण पुन्हा माझ्या लग्नाचा विषय काढायचा नाही, असं म्हणून नीता धाडधाड जिना चढून तिच्या खोलीत निघून गेली. खरंतर नीता दिसायला नाकीडोळी नीट्स, स्मार्ट, सडपातळ बांध्याची होती. लांबसडक काळेभोर केस, टपोरे निळेशार डोळे, गोबर्‍या गालातलं अपर नाक आणि गालावरच्या खळीने ती अधिकच आकर्षक दिसे. अभ्यासातही हुशार-एम.एस्सी, कॉम्प्युटरमध्ये डिग्री घेऊन एका नावाजलेल्या कंपनीमध्ये चांगल्या पगारावर स्थिरावलेली. कशातच काही कमी नव्हते. पण गेली एक-दोन वर्ष अनेक स्थळे पाहूनही लग्नाचे काही जमत नव्हते.
मध्यंतरी नीताला एक स्थळ आले. चहा पोह्याचा कार्यक्रम झाला आणि दुसर्‍या दिवशी मुलगी पसंत असल्याचा मुलाकडून फोन आला. नीतालाही मुलगा आवडला होता. त्यामुळे घरातील वातावरण एकदम आनंदमय झाले. मुलगा पंधरा-वीस दिवसांत लग्न करून अमेरिकेला जाणार होता, म्हणून मुलाकडची दहा बारा माणसे देणे-घेणे ठरविण्यासाठी नीताच्या आई-वडिलांना भेटण्यास आले. मुलाला हुंडा म्हणून त्यांनी 50 हजार रुपयांची मागणी केली. त्यात ते तडजोड करण्यास अजिबात तयार होईनात. हुंडा घेणार्‍याशी मला लग्न करायचे नाही, हे लग्न मोडले समजा. तुम्ही इथून जाऊ शकता, असं नीतान सांगितलं आणि ही पैशाला हापापलेली माणसं नीताच्या घरातून बाहेर चालती झाली.
आपण घेतलेला निर्णय योग्यच आहे, याची मनाशी खूणगाठ बांधून ऑफिस कामकाजाबरोबर नीताने समाजकार्यात स्वतःला झोकून दिलं.
मार्च महिना सुरू झाला. बाहेर उन्हाच्या झळा वाढत होत्या आणि ऑफिसमध्येही इयर एंडिंगच्या कामाचा वेग वाढत होता. त्याच वेळी नेमकं कोरोनानं थैमान घातलं आणि कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं अन् नीताचं आता वर्क फ्रॉम होम सुरू झालं. फावल्या वेळामध्ये घराघरांमध्ये जाऊन
सर्वेक्षण करणे, गरजूंना औषधे पुरवणं, जेवणाचे डबे पुरवणं यांसारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये नीता सहभागी होऊ लागली.
एक दिवस सर्वेक्षणाच्या कामासाठी एका बिल्डिंगमधल्या जोशी काकूंकडे नीता गेली असताना तिला समजले की, ते दोघे काका-काकूच त्या फ्लॅटमध्ये राहत आहेत. काकांची मागील वर्षी बायपास सर्जरी झाली होती. तर काकूंचे आठ दिवसांपूर्वी डोळ्याचे ऑपरेशन झाले होते. त्यांचा एम.टेक झालेला, नोकरीनिमित्ताने बेंगलोरला गेलेला मुलगा नितीन, आईची तब्येत बघण्यास आला आणि लॉकडाऊनमुळे तो इथेच अडकून गेल्याचे आणि त्याचे वर्क फ्रॉम होम इथूनच चालू असल्याचे बोलता-बोलता काकूंनी नीताला सांगितले.
लॉकडाऊनमुळे कोणी आता बाहेरून मदतीला येणे शक्य नसल्याने काकूंनी नीताला सहजच त्यांची अडचण सांगितली आणि पोळी-भाजीचा डबा पंधरा-वीस दिवस आम्हाला कोणी देऊ शकेल का, अशी विचारणा करताच नीता उत्तरली, काकू तुम्ही काही काळजी करू नका, मी तुमच्या डब्याची व्यवस्था करते, मी येथून जवळच राहते. दुसर्‍या दिवसापासून नीता रोज जोशीकाकूंच्या कडे जेवणाचा डबा पोचता करू लागली. जोशीकाकूंना नीताचा लाघवी स्वभाव, सहकार्य करण्याची तिची वृत्ती, समाजकार्य करण्याची तिची धडपड फारच भावली. दहा-बारा दिवस सकाळ-संध्याकाळ डबा घेऊन येणारी नीता आता सर्वांच्याच परिचयाची झाली. भावी सून म्हणून नीता योग्य आहे, असे वाटून त्यांनी तिला नितीनसाठी लग्नाची मागणी घातली. नीताच्या लग्नाबाबतचे स्पष्ट विचार सामाजिक कार्यकर्ता असलेल्या आणि शिक्षणाने प्रगत असलेल्या नितीनलाही पटले आणि लॉकडाऊनच्या काळात फक्त घरच्या माणसांसमवेत रजिस्टर लग्न करून लग्नासाठी करावयाच्या खर्चाची रक्कम उभयतांनी पी.एम. केअर फंडामध्ये जमा करण्याचा निर्णय घेऊन कोरोना काळात एक उत्तम आदर्श लोकांच्या पुढे ठेवला.

हे ही वाचा :आज अवि जाधव यांच्या व्यंगचित्रांचे  प्रदर्शन

अक्षय आनंदा’ची सोशल मीडियावर रौनक

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *