इंदिरा गांधी वसाहतीतील दगडफेकप्रकरणी सहा जणांना अटक

सिडको : विशेष प्रतिनिधी
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुने सिडको परिसरात असलेल्या इंदिरा गांधी वसाहत क्रमांक 1 परिसरात घरांवर आणि वाहनांवर
दगडफेक करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची घटनास्थळ व परिसरात धिंड काढत कायदा हातात घेणार्‍यांविरोधात कठोर कारवाईचा संदेश दिला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री आरोपींनी परिसरात आरडाओरड करत घरांवर व रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांवर दगडफेक केली. या घटनेत अनेक वाहनांचे नुकसान झाले, तर एका तरुणीला दगड लागून दुखापत झाली होती. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून संशयित आरोपी लक्ष्मण रमेश दांडेकर (वय 23), रवी दत्ता गायकवाड (वय 21), सचिन विजय दांडेकर (वय 22), हे तिघेही इंदिरानगर वसाहत क्रमांक 1, जुना सिडको येथील रहिवासी आहेत. तसेच स्वप्नील सुभाष जाधव (वय 23, रा. दत्तनगर, चुंचाळे), अमोल संतोष गायकवाड (वय 23, रा. विनयनगर, इंदिरानगर) आणि मिलिंद साहेबराव कांबळे (वय 25, रा. काठे गल्ली, नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. त्यानंतर रविवारी सायंकाळी इंदिरानगर वसाहतीत पोलीस बंदोबस्तात त्यांची परिसरात धिंड काढण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, अशा गुन्हेगारी प्रवृत्तींवर सातत्याने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करीत आहेत.

Avoid buying gold; use petrol sparingly!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *