घाईगडबडीत पेरणी नको!

पुरेसा पाऊस आणि जमिनीतील ओलावा पाहूनच निर्णय घेण्याचा कृषी विभागाचा सल्ला

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात मान्सूनपूर्व आणि मान्सूनच्या सुरुवातीच्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतजमिनीची मशागत पूर्ण करून अनेक शेतकरी आता खरीप पेरणीच्या तयारीत आहेत. मात्र, केवळ वरवरची माती ओली झालेली पाहून पेरणीची घाई करणे शेतकर्‍यांच्या अंगलट येऊ शकते, असा इशारा कृषी अधिकार्‍यांनी दिला आहे. जमिनीच्या आतपर्यंत पुरेसा ओलावा असल्याशिवाय केलेली पेरणी अत्यंत महाग पडू शकते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्ता भरणे यांनीही कृषी विभागाच्या सल्ल्यानुसारच पेरणी करण्याचा सल्ला शेतकर्‍यांना दिलेला आहे.
कृषी तज्ज्ञांच्या मते, सध्या पडत असलेल्या विखुरलेल्या पावसामुळे शेताच्या वरच्या थरावर ओलावा (नमी) दिसून येत आहे. हे पाहून अनेक शेतकरी सोयाबीन, मका, मूग, उडीद आणि तीळ यांसारख्या खरीप पिकांची पेरणी करत आहेत. परंतु, जर पेरणीनंतर लगेचच पुढील काही दिवस चांगला पाऊस झाला नाही, तर कडक उन्हामुळे बियाणे अंकुरण्यापूर्वीच जळून खाक होऊ शकतात किंवा अंकुर आल्यानंतर कोमेजून सुकू शकतात. अशा स्थितीत शेतकर्‍यांवर दुबार पेरणीची संकट कोसळू शकते, ज्यामुळे उत्पादन खर्च वाढून मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी करताना सांगितले आहे की, जोपर्यंत शेतात किमान 75 मिमी (किंवा सुमारे 4 इंच) इतका दमदार पाऊस होत नाही आणि जमिनीच्या खोलीपर्यंत पुरेशी ओल तयार होत नाही, तोपर्यंत पेरणी करणे टाळावे. खरीप पिकांच्या पेरणीसाठी जमिनीचे तापमान 28 ते 30 अंश सेल्सिअस दरम्यान असणेही आवश्यक मानले जाते. साधारणपणे 15 जून ते जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंतचा काळ खरीप पेरणीसाठी अत्यंत योग्य मानला जातो, त्यामुळे शेतकर्‍यांनी हवामान अंदाज आणि पावसाची योग्य उपलब्धता पाहूनच पेरणीचा निर्णय घ्यावा.

Avoid hasty sowing!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *