शहापूरजवळील चोंढे येथे पर्यटनास गेलेल्या पर्यटकांना पाण्याचा अंदाज आला नाही आणि धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढला. यात काही पर्यटक वाहून गेले आणि यात दोन जणांचा मृत्यू झाला. दरवर्षी पावसाळा पर्यटन करताना सातत्याने दुर्घटना घडतात. प्रशासनाकडून धोक्याच्या सूचना दिलेल्या असतानादेखील आडमार्गाने जाऊन नसते धाडस केले जाते आणि त्याची परिणती अशा दुर्घटनांमध्ये होते. गेल्या वर्षी मावळ तालुक्यातील इंद्रायणीवर असलेल्या जुन्या पुलावर दुर्घटना घडली आणि त्यात तीस ते पस्तीस जण वाहून गेले आणि चार जणांचा मृत्यू झाला. माथेरान येथेदेखील पर्यटनाला आलेले तिघे जण बुडून मृत्यू पावले होते तर नांदेडमध्येे पाच युवक गोदावरी नदीत बुडून मृत्यू पावले होते.
एखादी दुर्घटना, अपघात घडला की शासन – प्रशासन खडबडून जागे होते, काही तरी केल्याचे दाखवले जाते. राज्यकर्ते कोणालाही सोडणार नाही, दोषींना शिक्षा होणारच अशी राणाभिमदेवी थाटात घोषणा करतात. आर्थिक मदतीची घोषणा होते. राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. तू-तू-मैं-मैं होते आणि पुन्हा एखादी दुर्घटना घडते यापलीकडे काही होत नाही. दोन-पाच लाख रुपयांची मदत केली म्हणजे शासनव्यवस्थेची जबाबदारी संपत नाही. मात्र, अनेकदा ना कोणावर जबाबदारी निश्चित होते, ना कोणाला शिक्षा, ना कोणी दोषी ठरतो. तीन वर्षांपूर्वी गुजरातमधील मोरबी येथे पूल दुर्घटना घडून शेकडोंचे मृत्यू झाले होते.
काही वर्षांपूर्वी कोकणात सावित्री नदी पूल, मुंबईतील एल्फिन्स्टन पूल, हिमालय पूल, अशा अनेक घटना घडल्या, तेव्हादेखील अशाच राणाभिमदेवी थाटात घोषणा केल्या गेल्या. मात्र, ना कोणी दोषी, ना कोणाला शिक्षा झाली, ना दुर्घटना घडायच्या थांबल्या. वरून एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात अशा दुर्घटना घडतच असतात, ‘बडे बडे शहरोंमे छोटे छोटे हादसे होते ही रहते है’ अशी असंवेदनशील वक्तव्ये केली जातात आणि जबाबदारी टाळली जाते. घटना घडतच असतील तर त्या थांबवायच्या कोणी, केवळ जनतेला दोष देऊन चालणार नाही. शासन-प्रशासन व्यवस्था, कायदे नियम बनवले कोणासाठी आणि कशासाठी?
आजकाल पावसाळी पर्यटनाला दारू पिऊन, मांसाहार करून बेधुंदपणे वागणे असे स्वरूप आले आहे. त्यामुळे नवख्या ठिकाणी भान हरपून नको ते धाडस केले जाते आणि ते अनेकांच्या जिवावर बेतते. अतिउत्साहात, मस्करीच कुस्करी होते. एखाद्या घरात असा अपघाती, अघटित मृत्यू होणे याचे दुःख काय असते ते ज्याचे जळते त्यालाच कळते. निसर्गाशी केलेली छेडछाड याची किंमत या ना त्या स्वरूपात मोजावी लागते.
एका क्षणात आनंदाचे रूपांतर दुःखात होते आणि कुटुंब उद्ध्वस्त होते. पर्यटनस्थळ म्हटले की पर्यटक येणारच. अशावेळी बंदी घालणे हा उपाय नाही तर योग्य ती सुरक्षा यंत्रणा, धोक्याच्या ठिकाणी प्रतिबंधित उपाययोजना, गर्दी नियंत्रणाची गरज आहे. आतातर मान्सून सुरू झाला आहे आणि पावसाळी पर्यटनासाठी मोठ्याप्रमाणावर पर्यटक मौजमजेसाठी नदी, समुद्र, गडकिल्ले, धबधबे अशा ठिकाणी गर्दी करतात आणि नवख्या ठिकाणी नको ते धाडस करून आपला जीव धोक्यात घालतात आणि शासन-प्रशासन व्यवस्थेनेदेखील सतर्क राहण्याची गरज आहे.
आपणदेखील नवख्या ठिकाणी जिवावर बेतणारे नाहक धाडस करू नये आणि आपला जीव धोक्यात घालू नये.
Avoid unnecessary ‘daring’ while engaging in monsoon tourism.