रेल्वेचे आवाहन; अनधिकृत प्रवेश करणार्यांवर कारवाईचा इशारा
नाशिकरोड : विशेष प्रतिनिधी
रेल्वेमार्गाखाली पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी बांधण्यात आलेल्या हायड्रॉलिक (जलनिस्सारण) व वॉटर-वे पुलांचा वापर रस्ता किंवा रेल्वे रूळ ओलांडण्यासाठी करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
अनेक ठिकाणी पादचारी, दुचाकीस्वार, ट्रॅक्टर तसेच बैलगाड्या या अरुंद पुलांचा वापर रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, हे पूल केवळ पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहतुकीसाठी किंवा रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी अधिकृत मार्ग नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
पावसाळ्यात या पुलांमधील पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे वाहून जाणे, बुडणे किंवा गंभीर अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. नागरिकांनी रेल्वेमार्ग ओलांडण्यासाठी केवळ अधिकृत रस्ता उड्डाणपूल, भुयारी मार्ग, रेल्वे फाटक आणि पादचारी पुलांचाच वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
रेल्वेने स्पष्ट केले की, हे पूल कोणत्याही प्रकारचे अधिकृत रस्ते नसून केवळ जलनिस्सारणासाठी बांधण्यात आले आहेत. नागरिकांनी अफवा किंवा दिशाभूल करणार्या माहितीकडे दुर्लक्ष करून रेल्वे प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे.
रेल्वे हद्दीत अनधिकृत प्रवेश करणे हा दंडनीय गुन्हा आहे. रेल्वे अधिनियम 1989 मधील कलम 147 नुसार नियमांचे उल्लंघन करणार्यांना सहा महिन्यांपर्यंत कारावास, एक हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. रेल्वे सुरक्षा पथकांनी संवेदनशील ठिकाणी गस्त वाढवली असून, नियमभंग करणार्यांवर तत्काळ कारवाई केली जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी संबंधित ठिकाणी इशारा फलक बसविण्यात येत आहेत. जळगाव, नाशिक, बुलढाणा, अकोला, धुळे आणि खंडवा जिल्ह्यांतील प्रशासन, पोलीस विभाग आणि ग्रामपंचायतींनी अनधिकृत मार्ग बंद करणे, जनजागृती करणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वेने केले आहे.
भुसावळ विभागात 156 संवेदनशील पूल
भुसावळ विभागात 156 हायड्रॉलिक पूल असून, काही ठिकाणी त्यांचा अनधिकृत वापर होत असल्याचे आढळून आले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यात 71, नाशिक जिल्ह्यात 53, बुलढाणा 17, खंडवा 11 तसेच अकोला आणि अमरावती येथे प्रत्येकी दोन संवेदनशील ठिकाणांचा समावेश आहे.
Avoid using the route with hydraulic bridges.