कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर-शिर्डी राज्यमार्गाला रुंदीकरणाची प्रतीक्षा

सत्ताधार्‍यांच्या दुर्लक्षामुळे दोन विमानतळांना जोडणार्‍या मार्गाला मंजुरी कधी?

सिन्नर : प्रतिनिधी
मागील कुंभमेळ्यात रुंदीकरण झालेल्या ओझर – शिर्डी या राज्यमार्गाचे येणार्‍या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मजबुतीकरण व वाढीव रुंदीकरण करण्याची आवश्यकता असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर या कामाची मंजुरी प्रलंबित आहे. विशेष म्हणजे, हा मार्ग ज्या भागातून जातो तेथील सर्व आमदार हे सत्तेत आहेत. या सर्वांनी लक्ष घालून या मार्गाच्या रुंदीकरणास मंजुरी मिळवावी, अशी मागणी होत आहे.
मागील कुंभमेळ्याची कामे सुरू करताना आमदार माणिकराव कोकाटे व निफाडचे तत्कालीन आमदार अनिल कदम यांनी ओझर- सायखेडा- हिवरगाव- वडांगळी- पंचाळे- वावी – सायाळे व पुढे कोपरगाव तालुका हद्दीपर्यंत या राज्यमार्ग 35 च्या रुंदीकरणाची मागणी राज्यशासनाकडे केली होती. त्यास शासनाने मंजुरी देऊन हा मार्ग पूर्ण केला. त्यामुळे नाशिक, पिंपळगाव बसवंत, वणी, सापुतारा, शिर्डी, कोपरगाव आदी ठिकाणी जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा ठरत असल्याने यामार्गे वाहतूक वाढली. वाढत्या वाहतुकीमुळे या मार्गाचे रुंदीकरण करण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन विमानतळांना जोडणार्‍या या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव बनवला गेला आहे. मात्र त्यास मंजुरी दिली गेलेली नाही. नाशिकरोड, सिन्नरमार्गे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व अहिल्यानगर, शिर्डी आदी मार्गे कुंभमेळ्यासाठी येणार्‍या भाविकांना हा मार्ग सोयीचा ठरणार असल्याने त्यास कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

भूसंपादनाची आवश्यकता नाही

विद्यमान रस्त्याच्या बाजूला सार्वजनिक बांधकाम विभागाची जमीन असल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी नव्याने भूसंपादन करावे लागणार नाही. अनेक ठिकाणी भूसंपादनाअभावी कुंभमेळा रस्त्याची कामे सुरू होऊ शकलेली नाहीत. या मार्गासाठी मात्र भूसंपादनाची आवश्यकता नसतानाही त्यास मंजुरी मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

एक मंत्री, तीन सत्ताधारी आमदार असूनही मंजुरी प्रलंबित

राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघाला जोडणारा हा मार्ग युतीतील आमदार आशुतोष काळे, माजी मंत्री, आमदार माणिकराव कोकाटे व आमदार दिलीपराव बनकर यांच्या मतदारसंघातून जाणारा हा रस्ता आहे. सर्वच सत्ताधारी लोकप्रतिनिधी असताना जनतेच्या हिताचा हा मार्ग मंजूर होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्वांनी यासाठी आपली ताकद लावावी, अशी मागणी होत आहे.

ही ठिकाणे येणार जवळ

वावीहून पुढे सिन्नरहून नाशिकला जाण्याऐवजी यामार्गे थेट शहरी भाग टाळून तपोवनात जाता येते. तपोवनातून थेट चांदोरी-सायखेडामार्गे शिर्डीला जाता येईल. नागपूर, छत्रपती संभाजीनगरहून समृद्धीमार्गे येणार्‍यांना शिर्डीजवळ उतरून पुढे वावी जवळून यामार्गे तपोवन, वणी, सापुतारा आदी भागांत नाशिक टाळून जाता येते. गुजरातहून शिर्डीला जाणार्‍या भाविकांना शिर्डीस जाण्यास सोयीचा मार्ग आहे.

Awaiting widening of Ozar-Shirdi state highway in view of Kumbh Mela

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *