गैरकृत्य केल्यास सहा महिने निलंबन; महापौरांचा इशारा
नाशिक : प्रतिनिधी
नवीन नाशिकच्या (सिडको) पहिल्याच प्रभाग सभेत भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि मुकेश शहाणे या दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली होती. एकमेकांना शिवीगाळ करत दोघांत जोरदार राडा झाला होता. दरम्यान, याप्रकरणी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी यापुढे असे प्रकार घडता कामा नयेत, अन्यथा सदस्यांचे थेट सहा महिन्यांसाठी निलंबन करण्यात येईल, असा इशारा दिला.
महापालिकेची महासभा महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 30 जून) झाली. यावेळी मनपा आयुक्त मनीषा खत्री, उपमहापौर विलास शिंदे आदी उपस्थित होते. सभागृहाचे कामकाज सुरू होताच सोमवारी (दि.29) नवीन नाशिकमध्ये झालेल्या राड्यासंदर्भात उपमहापौर विलास शिंदे, गटनेते अजय बोरस्ते, दिनकर पाटील, जॉय कांबळे यांनी महापौरांना पत्र देत संबंधित सदस्यांना झालेल्या प्रकाराबद्दल समज द्यावी. भविष्यात असे प्रकार घडणार नाहीत, अशी मागणी केली. बडगुजर आणि अपक्ष नगरसेवक शहाणे यांच्यात वाद होऊन शिवीगाळ झाली होती; परंतु हे सर्व घडत असताना सभागृहात महिला प्रतिनिधी, अधिकारी होते. सभागृहाचे कामकाज सुरू होताच या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली.
उपमहापौर शिंदे म्हणाले की, सोमवारचा प्रकार खेदजनक असून, यामुळे महापालिकेची नव्हे, तर शहराची प्रतिमा मलिन झाली आहे. यामुळे शहराची मान शरमेने खाली गेल्याचे शिंदे म्हणाले. सदस्य डॉ. हेमलता पाटील, पल्लवी गणोरे यांनीदेखील सभागृहात महिला उपस्थित असताना असले प्रकार चुकीचे असून, पुन्हा असे प्रकार होणार नाहीत, याची दक्षता घ्यावी. आपण लोकप्रतिनिधी असून, काय बोलतो आहोत याचे भान ठेवावे, असे गणोरे यांनी सांगून या घटनेचा निषेध केला. जॉॅय कांबळे व राहुल दिवे यांनीही सभागृहात महिला लोकप्रतिनिधी असून, शहराचे प्रतिनिधित्व करणार्या महिलाच आहेत. पण सदस्यांकडून त्यांच्यासमोरच शिवीगाळ होत असेल तर ही शहरासाठी चांगली बाब नाही. काही दिवसांपूर्वीच्या नगरसेवक व अधिकार्यातील वादावर भाष्य करताना कांबळे म्हणाले की, लोकप्रतिनिधी आहोत म्हणून अधिकार्यांना अरेरावीची भाषा कोणीही खपवून घेणार नाही. अधिकारी-लोकप्रतिनिधींनी एकमेकांचा आदर करणे आवश्यक आहे.दरम्यान, या प्रकारामुळे नाशिकची राज्यातच नव्हे, तर देशभरात बदनामी झाली आहे. सदस्यांकडून वापरली जाणारी भाषा अशोभनीय असल्याचे म्हटले. भाजपाचे गटनेते अॅड. श्याम बडोदे यांनी सभागृहात चर्चेचा समारोप करताना महापौरांनी आवश्यक ती कारवाई केली पाहिजे. यापुढे अशा घटना होऊ नयेत आणि नगरसेवकांचा मानसन्मान कायम राहावा, अशी मागणी केली.
पूर्वसूचना न देता निलंबन
महापालिकेच्या महासभेत, तसेच प्रभाग सभेत कोणत्याही नगरसेवकांनी गैरवर्तन केले तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नाही. संबंधितांना कोणतीही पूर्वसूचना न देता सहा महिन्यांसाठी निलंबित केले जाईल. शहराचा विकास महत्त्वाचा असून, नाशिकचा सर्वत्र लौकिक असताना नगरसेवकांच्या गैरकृत्यामुळे शहराची बदनामी होत असेल तर ते सहन केले जाणार नाही, याचे संबंधितांनी भान ठेवावे. – हिमगौरी आहेर-आडके, महापौर, मनपादोन्ही नगरसेवकांकडून दिलगिरी
नगरसेवक सुधाकर बडगुजर, मुकेश शहाणे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल महासभेत दिलगिरी व्यक्त केली. शहाणे यांनी, नकळतपणे सभागृहात बोलले गेल्याचे स्पष्टीकरण देत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
Badgujar-Shahane dispute echoes in the General Body meeting.