भारत हा कृषिप्रधान देश असून, शेती हा मुख्य व्यवसाय आहे. त्यात महाराष्ट्राचा वाटा देशपातळीवर मोठा आहे. मात्र, आजच्या घडीला दुष्काळ, अतिवृष्टी, वातावरणातील बदल, खालावलेली भूगर्भाची पाणीपातळी अशा अनेक बाबींचा सामना करत शासन नवनव्या कृषी योजना राबवत आहे. सततच्या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जात शेतकरी जीवन जगत आहे. देशात आपले राज्य धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण असावे, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून कृतीची जोड देत दोन वर्षांत महाराष्ट्र स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन, असे 1965 मध्ये निक्षून सांगणार्या वसंतराव नाईक यांनी राज्याला शेतीप्रधान म्हणून ओळख मिळवून दिली. सतत 11 वर्षे मुख्यमंत्रिपद भूषविलेले दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक महाराष्ट्रातील हरितक्रांतीचे प्रणेते ठरले. त्यांचा 1 जुलै जन्मदिन महाराष्ट्रात कृषिदिन म्हणून साजरा होतो.
महाराष्ट्रात सध्या विविध धरणांत मुबलक पाणीसाठे असल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवत नाही. शेती बारमाही होऊ लागल्याने धान्य पिकांऐवजी नगदी पिके घेण्याकडे शेतकरी वर्गाचा कल वाढला. शिवाय पाण्यासाठी 200 ते 500 फुटांपर्यंत कूपनलिका घेतल्या जात आहेत. त्यामुळे भूगर्भाची चाळण झाली आहे. कमी दिवसांत जास्त नफा देणारी पिके घेण्याकडे शेतकरी वर्गाचा कल आहे. त्यामुळे सर्रास रासायनिक खते, कीटकनाशके, औषधांचा वापर होत आहे. त्यामुळे शेतीचा पोत बिघडला आहे. रासायनिक वापरामुळे अन्नधान्य, पालेभाज्या व फळांमधील जीवनसत्त्वे हरवली आहेत. येणारा जीवनकाळ रोगमुक्त हवा तर सेंद्रिय शेती करण्यावर भर द्यावा लागणार आहे. राज्यात दरवर्षी सरासरी 60 लाख टन रासायनिक खतांचा वापर केला जातो. रासायनिक खतांचा अतिरेकी वापर करण्याने पिकांवर परिणाम तर होणारच. यातून तयार होणारे धान्य, भाज्या, शेंगा, फळे खाण्यास योग्य राहत नाहीत. युरोपियन देशानी शेतीमाल आयात करताना त्यांची परीक्षा केली जाते. उत्तम सेंद्रिय पद्धतीच्या शेतमालाला योग्य बाजारपेठा आहेत. धान्य पिकांवर तणनाशक, रोगप्रतिकारक औषधे मारल्याने त्यांचे अंश धान्यात उतरतात. त्यामुळे धान्यातील घटक नाहीसे होतात. रासायनिक खते, कीटकनाशके, जंतुनाशके वापरल्याने ते जमिनीवर पडतात. परिणामी
जमिनीत पाण्याबरोबर मुरून भूगर्भातील पाणी दूषित झाले आहे. फळाना रंग व आकार वाढीसाठी अनेक प्रयोग केले जात आहेत. त्याचा दुष्परिणाम शरीरावर होतात. कॅन्सरसारख्या आजारांचे प्रमाण वाढत चालले आहे. याचे पंजाबात परिणाम जाणवू लागले आहेत. अनेक घातक कीटकनाशकांवर बंदी असली तर रासायनिक पद्धतीच्या वापरास भारतात 45 वर्षे उलटून गेली आहेत. त्याचा झालेला दुष्परिणाम भरून येण्यास आणखी 50 वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
सेंद्रिय शेती करण्याबाबत सिक्कीम आघाडीवर आहे. ते पहिले सेंद्रिय राज्य ठरले आहे. त्याबरोबर केरळमध्येसुद्धा सेंद्रिय शेती यशस्वी झाली आहे. सेंद्रिय शेती विकसित करण्यासाठी योजना असून, त्या अमलात आणण्यासाठी शेतकरी उदासीन झाला आहे. महाराष्ट्रातील शेतकरी अल्पभूधारक झाल्याने अधिक उत्पादन व नफा घेण्याकडे कल आहे. त्यात बाजारभाव स्थिर नसल्याने रासायनिक पद्धतीने शेती सुरू आहे.
सेंद्रिय खते वापरल्याने शेती कायमस्वरूपी सुपीक राहते. पारंपरिक पद्धतीची खते यात शेणखत, कोंबडखत, पालापाचोळ्यापासून केलेले खत, हिरवळीची खते यात ताग पिकाचा वापर केला जातो. लिंबोळी खत याशिवाय गांडूळखत, माशाचे खत, खाटीकखान्यातील खत याशिवाय वराह, शेळी, मेंढी यांच्या विष्टेपासून खत मिळते. कीटकांचा प्रतिबंध करण्यास रोगमुक्त बियाण्यांचा वापर करणे, पिकावरील कीड खाण्यास पक्ष्यांंची शेतबांधावर घरटी होणे आवश्यक आहे. भुंगेरे पकडण्यास विजेचे दिवे सापळे, चिकट पेपर, कीडनाशक द्रावण तयार करण्यास कडुनिंब अर्क, तसेच गोमूत्र आधिक प्रभावी आहे. नासलेल्या दह्याचा वापर करून जीवामृत तयार करता येते. रासायनिक खते व औषधे त्वरित उपलब्ध होतात. त्यामुळे सेंद्रिय खते व कीडनाशक द्रावण तयार करण्यास वेळ लागतो. म्हणून सेंद्रिय पद्धतीकडे डोळेझाक होते. अति बागायत पिकांमुळे धान्य पिकांची शेती कमी झाली. परिणामी पक्षी, मधमाश्या, फुलपाखरे नाहीसे झाले. बांधावरची उंच झाडे गेली. त्यामुळे पक्ष्यांचा निवाराही गेला. त्यामुळे कीड अधिक बळावली आहे. राज्यात कृषी विभागामार्फत सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी विविध योजना आहेत. त्याचा प्रचार-प्रसार व वापर झाला पाहिजे, तर उन्नत शेती व समृद्ध शेतकरी होईल. जर हे स्वप्न अस्तित्वात आले तर मानवी जीवन आरोग्यमय होईल.
Organic farming is essential for a healthy life.