पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची बदली

जयंत नाईकनवरे नवे पोलीस आयुक्त
नाशिक : वार्ताहर
हेल्मेट सक्ती आणि महसूल खात्यातील कारभाराबद्दल थेट लेटर बॉम्ब फोडून संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिल्यामुळे वादग्रस्त ठरलेले पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांची विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून मुंबईत बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मुंबईच्या व्हिआयपी सुरक्षा विभागाचे उपमहानिरीक्षक जयंत नाईकनवरे यांची पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नतीवर नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी काल सायंकाळी विशेष पोलीस महानिरीक्षक संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले.
गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या बदलीची चर्चा रंगली होती. नाशिकमध्ये हेल्मेट सक्तीच्या निर्णयाची अमलबजावणी करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग राबविले. विनाहेल्मेट पेट्रोल दिल्यास थेट आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरला होता. त्यावरुन नाशिकमध्ये एक दिवसाचा पेट्रोलपंप बंद पाळण्यता आला होता. त्यानंतर महसूल विभागातील काही अधिकारी हे डिटोनेटर आणि भूमाफिया हे आरडीएक्स असल्याने महसूलचे अधिकार आपल्याला देण्यात यावेत, असे पत्र पोलीस महासंचालकांना पाठवून त्यांनी राज्यात खळबळ उडवून दिली होती. या पत्रावरून ते चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे न हटविल्यास मशिदीसमोरच हनुमान चालिसा म्हणण्याची घोषणा केल्यानंतर आयुक्त पांडेय यांनी मशिदीबरोबरच इतरही प्रार्थना स्थळावरील भोंगे अनधिकृत असल्याचे सांगत भोंग्यासाठी 3 मेपर्यंत परवानगी घेण्याची व नमाजच्या वेळेत हनुमान चालिसा म्हणता येणार नाही. असे आदेश काढले होते. गुढीपाडव्याच्या स्वागत यात्रेच्या परवानगीवरुन मतभेद निर्माण झाल्याने त्यांनी पोलीस महासंचालकांकडे आपल्या बदलीचा अर्ज दिला होता. तेव्हापासून त्यांच्या बदलीची चर्चा रंगली होती. नाशिकमध्ये दीड वर्षांपूर्वीच आलेल्या पांडेय यांनी अनेक निर्णय घेतले. भूमाफिया राज संपविण्यासाठी त्यांनी मोक्काची कारवाईवर भर दिला. नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यामुळे पांडे संपूर्ण राज्यात गाजले होते.
नाशिकचे पोलीस आयुक्त म्हणून जयंत नाइकनवरे हे मुंबईत व्हिआयपी सुरक्षा विभागात होते. त्यांची पदोन्नती होऊन त्यांना नाशिकचे आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.

आता कारवाईचा भोंगा वाजणार
बी.जी. शेखर यांना पदोन्नती
नाशिकचे विशेष पोलीस उपमहानिरीक्षक असलेले बी.जी.शेखर यांना विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश काल काढण्यात आले. गृह विभागाने 22 आयपीएस अधिकार्‍यांच्या पदोन्नतीवर बदल्या केल्या आहेत. पिंपरी चिंचवडचे वादग्रस्त आयुक्त कृष्णप्रकाश यांची मुंबईत व्हिआयपी सुरक्षा विभागाचे पोलीस महानिरीक्षक म्हणून बदली करण्यात आली आहे. एका आरोपीला पकडण्यास गेल्यानंतर झाड फेकून मारल्याचा त्यांचा दावा राज्यात गाजला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *