इंदिरानगर| वार्ताहर | बालभारती महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक भांडार वितरण केंद्रावर शासनाने नेमलेले भांडार व्यवस्थापक लक्ष्मण यशवंत डामसे ऑन ड्युटी दारूच्या नशेत आढळून आले. शालेय विद्यार्थ्यांचे ज्ञान भांडार समजल्या जाणाऱ्या बालभारती मध्ये हा उघडकीस आल्याने संताप व्यक्त होतो आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लेखा नगर येथील बालभारतीच्या वितरण केंद्रावर मुख्य भांडार व्यवस्थापक लक्ष्मण यशवंत डामसे हे ऑन ड्युटी दारु पिऊन महिला व इतर कर्मचारी, तसेच माथाडी कामगारांना त्रास देत होते. याबाबत पुस्तकी अधिक्षक शुभांगी नांदखिले ह्यांनी श्रमिक माथाडी व गार्डबोर्ड संघटनेच्या कार्यालयात तक्रार केली होती संघटनेचे पदाधिकारी सागर देशमुख, शिवसेना इंदिरानगर विभागप्रमुख निलेश साळुंके हे भांडार व्यवस्थापकांना भेटण्यासाठी गेले असता ते बालभारती कार्यालयाच्या वरती असेलल्या त्यांच्या शासकीय निवासस्थानी दारू पित असल्याचे आढळून आले. त्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पदाधिकाऱ्यांनी आणि इतर कर्मचाऱ्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला फोन करून सदरची गंभीर बाब निदर्शनास आणून दिली. त्यानंतर लक्ष्मण डामसे यांचे मेडिकल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घडलेल्या घटनेची माहिती बालभारतीचे संचालक कृष्णकांत पाटील यांनाही फोन द्वारे केली असता त्यांनी निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन दिले.