निफाड उपजिल्हा रुग्णालयात आता १०० खाटा

दिक्षी प्रतिनिधी

निफाड येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याची माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली.
निफाड तालुक्याची लोकसंख्या बघता परिसरातील अनेक गावांचा तालुक्याच्या गावी प्रत्यक्ष संपर्क आहे. सध्या कार्यान्वित असलेले उपजिल्हा रुग्णालयामध्ये फक्त ५० खाटा इतक्या कमी खाटांमुळे रुग्णांवर गरज असतानाही उपचार करणे शक्य होत नव्हते. कोरोना कालावधीमध्ये निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असतांना तालुक्यातील निफाड उपजिल्हा रुग्णालय, पिंपळगाव बसवंत ग्रामीण रुग्णालय, लासलगाव ग्रामीण रुग्णालय तसेच इतर खाजगी हॉस्पिटलची क्षमता संपल्यानंतर कोरोना सारख्या महामारीत रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे गरजेचे आहे हे लक्षात घेऊन निफाड उपजिल्हा रुग्णालयाच्या ५० खाटांची क्षमता दुपटीने म्हणजे १०० खाटांची करण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्याचबरोबर पिंपळगाव बसवंत व लासलगाव हेही प्रस्ताव सादर करण्यात आलेले आहे. त्यातील निफाड येथील ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास व लासलगाव ग्रामीण रुग्णालय ३० खाटांचे ५० खाटांमध्ये श्रेणीवर्धन करण्यास महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मान्यता दिली आहे. सध्या कार्यान्वित असलेल्या निफाड उपजिल्हा रुग्णालयामध्ये ७ मेडिकल ऑफिसर कार्यरत आहे. त्यात वाढ होऊन एकूण १३ मेडिकल ऑफिसर काम करतील, डोळ्यांची शस्त्रक्रिया, सिटी स्कॅन, सोनोग्राफी या सारख्या सुविधासह विविध आजारांचे विशेष तज्ञ डॉक्टर उपलब्ध राहून नाशिकच्या शासकीय रूग्णालयाप्रमाणे सर्व प्रकारच्या सोईसुविधा येथे उपलब्ध होतील. आजमितीस निफाड या तालुक्याच्या जागी या रुग्णालयासाठी ५ एकर जागा उपलब्ध असून उर्वरित जागेत साधारणत: ५५ कोटी पर्यंत खर्च करून इमारत व इतर सोईसुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. नाशिक जिल्ह्यात आजमितीस कळवण, त्रंबक व येवला येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय स्थापन झालेले आहे. त्यानंतर चौथ्या नंबरवर निफाडला स्थापन प्राप्त होणार आहे. यामुळे सद्यस्थितीतील येणाऱ्या अनेक प्रकारच्या मर्यादा थांबवून आवश्यक त्या सर्व सोयसुविधा उपलब्ध होणार असून सदर उपजिल्हा रुग्णालयाचे १०० खाटांचे श्रेणीवर्धन करण्यात आले असून तालुक्यातील गरजूंना वैद्यकीय उपचाराच्या दर्जेदार आणि वाढीव सुविधा उपलब्ध होणार असल्याने निफाडकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब व नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनराव भुजबळ साहेब यांचे निफाड तालुक्याच्या जनतेच्या वतीने आमदार दिलीपराव बनकर यांनी जाहीर आभार मानले.

गेल्या अनेक वर्षापासून निफाड उपजिल्हा रुग्णालयात सर्व प्रकारच्या आजारावर उपचार होण्यासाठी सर्व सुविधायुक्त रुग्णालय व्हावे याकरीता गेल्या २ वर्षापासून पाठपुरावा केला. त्यामुळे बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या उपजिल्हा रुग्णालयाच्या १०० खाटांचा श्रेणीवर्धन करण्याचा प्रश्न सोडविण्यास महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून यश आले. गोरगरीब जनतेला निश्चितच सुर्व सुविधायुक्त मोफत वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत होणार आहे.
आमदार दिलीपराव बनकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *