संपादकीय

बळीराजा दुर्लक्षितच

जैसे स्थिती आहे तौशापरी राहे ।
कौतुक ते पाहे संचिताचे ॥
संत-वचनाप्रमाणे बळीराजा सतत वाटचाल करत असतो आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न करतो. अल्पसंतुष्ट असलेला हा बळीराजा चुकून वर्षातून एखादे पीक चांगले येऊन त्याला भाव बर्‍यापैकी मिळाला आणि चार पैसे घरी आले तर तो आनंदित होतो; परंतु वरील परिस्थितीचा फारच कमी लोकांना त्याचा प्रत्यय येतो. अवकाळी, नापिकी, पडलेले बाजारभाव, सरकारी दुरवस्था यांपैकी एखादे तरी अरिष्ट त्याला सतावतेच आणि जैसे थे परिस्थिती निर्माण होते. कायमच असुरक्षित, बेभरोशाचा असलेला शेतीधंदा आता मोडकळीला आलेला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सर्वच घटकांनी दुर्लक्षित केलेला हा बळीराजा आता हताश झाला आहे. शेतीमालाला दोन पैसे मिळू लागले की खाणारे ओरडतात आणि भाव पडले तर रस्त्यावर माल फेकावा लागतो आणि त्याकडे सगळे तटस्थ पाहून गंमत बघतात.
ऐेंशीच्या दशकात शेतकर्‍यांचे तारणहार (कै.) शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी एकत्र आला. उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळावा म्हणून प्रचंड ताकदीने आंदोलने केली. त्यात उसाची व कांद्याची आंदोलने खूपच गाजली. त्या आंदोलनांची दखल जगाने घेतली. विशेषतः बीबीसी, लंडनसारख्या वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी महाराष्ट्रात तळ ठोकून आंदोलनाचे वृत्त प्रसारित करीत असल्याचे संपूर्ण जगाने पाहिले. त्याकाळी राज्य आणि केंद्रीय सत्ताधार्‍यांनी आंदोलनं दडपून टाकण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण शेतकरी दबलाही नाही, जुमानलाही नाही. शेतकर्‍यांचे पंचप्राण (कै.) शरद जोशी यांच्या शब्दाखातर लाखो शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते. सरकार कोणतेही असो ते कायमच शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करते. कारण शेतकरी व शेतकरी नेते एकसंघ व संघटित नाहीत. त्याचा नेमका फायदा सगळेच सत्ताधारी घेत असतात. गेल्या चाळीस वर्षांत अनेक शेतकरी आंदोलने झाली. सर्वांत जास्त प्रभावी व परिणामकारक आंदोलन शेतकरी संघटनांच्या माध्यमातून स्वर्गीय शरद जोशी यांनी केले आणि बहुतांशी शेतकर्‍यांना काही काळ का होईना न्यायही मिळवून दिला. या प्रभावी आंदोलनांमुळे सरकारी दरबारी शेतकरी वर्गाची नोंद तरी झाली. त्याचा तात्कालिक फायदा शेतकर्‍यांना झाला.
शेतकर्‍यांच्या हृदयात कायमची श्रद्धा असलेले स्व. शरद जोशी यांच्यावर शेतकर्‍यांनी भरभरून प्रेम केले आणि ते शेतकर्‍यांचे पंचप्राण ठरले. तो काळ शेतकरी आंदोलनासाठी सुवर्णकाळ ठरला. दुर्दैवाने नंतरच्या काळात राजकीय हव्यासापायी शेतकरी संघटनेची अनेक शकले झाली. प्रत्येकाने आपले सवते सुभे उभे केले. त्यात शेतकरी हिताकडे साफ दुर्लक्ष करून स्वार्थ साधण्यासाठी नेत्यांमध्ये चढाओढ सुरू झाली. राजकीय महत्त्वाकांक्षा वाढीस लागली.
तत्कालीन संघटनेतील पहिल्या फळीतील नेते राजकीय पक्षाच्या वळचणीत जाऊन बसले. त्याचा काहींना तात्कालिक फायदाही झाला आणि त्यातले काही आमदार, मंत्री होऊन काहींना कारखान्यांचे चेअरमन, महामंडळेही मिळाली; परंतु काही काळाने ती पदंही गेली आणि कालांतराने त्यांच्याच पुण्याईने कारखान्यांना, सूतगिरण्यांना कुलूपंही लागली. एकेकाळी हेच नेते शेतकरी चळवळीचा भाग असताना लोकांच्या गळ्यातील ताईत बनले होते. हजारो लोक त्यांच्या हाकेखातर जमत होते. हे नेते शेतकरी हितासाठी काहीतरी करतीलच अशी भोळीभाबडी आशा घेऊन त्यांच्या मागे पळत होते. कालांतराने त्यालाही ओहोटी लागली. परिणामी आज शेतकरी आंदोलनाची धग कमी झाली.शेतकर्‍यांना आवाहन करूनही ते पुरेशा संख्येने जमत नाहीत. लोकं नैराश्यात गेले. त्यामुळे आज शेतकरी शेती मालाच्या भावासाठी आंदोलनाची हाक देऊनही एकत्र येत नाहीत.
तथाकथित शेतकरी नेते राजकीय दावणीला बांधले गेले. परिणामी त्यांची विश्वासार्हता कमी झाल्यामुळे लोक त्यांना प्रतिसाद देत नाहीत. आता हेच शेतकरी नेते म्हणतात की, लोक आंदोलनात उतरत नाहीत. पाठिंबा देत नाहीत, पण का? असे का होते? या नेत्यांनी शेतकर्‍यांची मानसिकता बघावी व आत्मपरीक्षण करावे.
आता तर तेलही गेले आणि तूपही गेले हाती धुपाटणे आले, अशी अवस्था शेतकरी नेत्यांची झाली आहे. त्यातही काही लबाड कोल्हे मधल्या मार्गाने जरी प्रस्थापित झाले असले, तरी दुर्दैवाने शेतकरी हितासाठी ते काहीही करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे ते जे काही आज आहेत ते केवळ शेतकर्‍यांच्या पुण्याईमुळेच आहेत. खाल्लेल्या अन्नाला जागावे, ही माफक अपेक्षा!
आता एकच हुकमी मार्ग म्हणजे राजकारणविरहित केवळ आणि केवळ शेतकरी हितासाठी संघटना उभी करून शेतकरी हितासाठीच आंदोलने उभी केली तर निश्चितच शेतकर्‍यांना न्याय मिळू शकतो. त्यासाठी स्व. शरद जोशी यांच्या विचारांचा वारसा नेटाने पुढे न्यायची तयारी ठेवावी लागेल. शेतकरी प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष, हेटाळणी, उपहास हे सर्व संपवायचं असेल तर सर्वांनी एकत्र येऊन केवळ शेतकरी हितासाठी संघटना उभी करावी व आपले जुने वैभव प्राप्त करावे, हीच खरी (कै.) शरद जोशी यांना श्रद्धांजली ठरेल!

Sheetal Nagpure

शीतल नागपुरे या गांवकरी मध्ये डिजिटल विभागात कार्यरत असून, १ वर्षापासून ऑनलाइन वृत्त संकलनाचे काम करत आहेत. त्या पदवीधर असून, त्यांना वाचनाची आवड आहे.

Recent Posts

पितृपक्षात त्र्यंबकला 25 कोटींची उलाढाल

प्रशासकीय उदासीनतेमुळे भाविकांचे हाल, नाराजीचा सूर त्र्यंबकेश्वर : प्रतिनिधी सद्यःस्थितीत संपलेल्या पितृपंधरवड्यात (27 सप्टेंबर ते…

18 hours ago

नवरात्रोत्सव प्रथा-परंपरेनुसार साजरा व्हावा!

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव शेकडो वर्षांपासून कुलाचार म्हणून साजरा केला जात आहे. ज्यात घटस्थापना ही प्रधान असते.…

19 hours ago

चौकशी व्हायला पाहिजे!

कॉक्रोेच जनता पार्टीला (सीजेपी) निधी कोठून आणि कसा मिळतो, हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला आहे.…

19 hours ago

पन्नास रुपयांच्या पिझ्झ्यातून व्यावसायिक भरारी

सुचिता पाटील यांनी निवडली यशाची वेगळी वाट ♣ नवदुर्गां ♣ नाशिक : प्रतिनिधी महिला आता…

19 hours ago

डासांवर 40 कोटींची फवारणी

पेस्ट कंट्रोलसाठी लवकरच निविदा, अडचणीच्या भागात ड्रोनद्वारे धूर फवारणी यानुसार असेल काम टेंडर 1 :…

19 hours ago

खड्ड्यांवरील अहवाल प्रलंबित

नगर परिषद संचालनालय प्रशासनाची नाराजी नाशिक : प्रतिनिधी खड्ड्यांमुळे झालेले अपघात, नुकसानभरपाई आणि निष्काळजीपणा करणार्‍या…

19 hours ago