बालमजुरीचे दाहक वास्तवदर्शन : पोर्‍या

बालमजूरमुक्तीच्या कार्यात संवेदनशीलतेने आपल्या जाणिवा जागृत ठेवून प्रामाणिक काम करणार्‍या सरकारी अधिकार्‍याने लिहिलेला ‘पोर्‍या’ हा कथासंग्रह आहे. ‘पोर्‍या’चे लेखक महाराष्ट्र राज्याचे कामगार उपायुक्त आहेत. सरकारी सेवेत असूनही आपले काम व जबाबदारी एवढीच औपचारिक संकुचित चौकट आखून न घेता सेवेतील कर्तव्याच्या निमित्ताने बालमजूर मुक्तीचे आलेले अनुभव, घटना-प्रसंग, अनेक अडचणी, प्रश्न-समस्यांना चिकाटीने सामोरे जात सतत केलेला पाठपुरावा पोर्‍या कथासंग्रहात आपणास वाचयला मिळतो. बालकामगार क्षेत्रात काम करताना आलेली निराशा, हताशा यामुळे मागे न सरता अस्वस्थ होत यथाशक्ती बालकांच्या सुटकेचे केलेले प्रयत्न व यश याबाबतचा एक विस्तृत पट शैलेंद्र पोळ आपल्या मपोर्‍याफ कथासंग्रहातून प्रभावीपणे मांडतात.
सर्वसाधारणपणे अनेक साहित्यिक लिहितात तसे हे काल्पनिक, मनोरंजनपर वा स्वांतसुखाय असे लेखन नसून, एका संवेदनशील, जबाबदार अधिकार्‍याने आपल्यातील माणूसपण, चांगुलपण, सामाजिक उत्तरदायित्व आणि ममत्व याचे भान ठेवून लिहिलेले हे वास्तव कथन आहे. सन 2005 राज्याच्या कामगार आयुक्तालयाने हजारो बालकामगारांची मुक्तता करून त्यांना शिक्षणाची मवाटफ दाखवून त्यांच्या आयुष्याची वाट लागण्यापासून वाचविले आहे शैलेंद्र पोळ हे रूढार्थाने साहित्यिक नसले तरी त्यांच्या लेखनशैलीतून चांगला साहित्यिक दिसतो. ‘पोर्‍या’ या कथासंग्रहात बालमजुरांच्या दाहक, भयाण जगण्या-भोगण्याच्या विविध वीस कथा आहेत. कथा सहज समजतील अशा आहेत. मोजक्या शब्दात परिणामकारक ठरतात. प्रत्येक कथेचा समारोप आपल्यापुढे एक प्रशचिन्ह उभा करतो.
एकीकडे आपले सुखाचे, सुरक्षित आयुष्य जगताना दुजीकडे बालमजुरांचे वेदनादायक, असुरक्षित, शोषणयुक्त जगणे किती विदारक आहे? याची प्रकर्षाने जाणीव होते ती ह्या कथासंग्रहातील ऑफिस, टेलिफोन, जय हो, वडापाव, रेलगाडी या कथा वाचून. कथासंग्रहासाठी ‘चटके आणि झटके’ ह्या शीर्षकाखाली ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर ह्यांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. केतकरांना ‘पोर्‍या’ कथासंग्रह वाचून आलेली पराकोटीची अस्वस्थता, बसलेले धक्के, पडलेले प्रश्न, नाना सामाजिक वृत्ती-प्रवृत्तींचा वाटणारा संताप, आपल्या हतबलतेचे अपराधीपण, बालमजुरीआड मुलांचे होणारे शोषण व त्यातून हिटलरच्या छळछावण्यांची होणारी नकोशी आठवण हे मुद्दे प्रस्तावनेतील शब्दाशब्दातून स्वाभाविकरीत्या येतात. ते या संग्रहास कथा नव्हे तर व्यथासंग्रह म्हणतात. या व्यथा वाचकास त्याच्या निवांत कोषातून बाहेर यायला भाग पाडतात. हे पुस्तक वाचताना सतत मला अपराधीपणाच्या भावनेने वेढले आहे. हा ‘गिल्ट कॉन्शन्स’ तुमच्याही अंतःकरणात उमलला तर पुस्तकाचा हेतू साध्य होईल. शैलेंद्र पोळ यांनी या पुस्तकात जळजळीत व अघोरी वास्तवावर फ्लडलाईट टाकलेला आहे. अजून त्यांच्यासारखे अधिकारी, आयुक्त, नोकरदार आहेत म्हणून न्याय व करुणेचा कवडसा तरी दिसतो. हे कुमार केतकरांचे प्रामाणिक मत पुस्तकाच्या आशयाबद्दल प्रभावीपणे भाष्य करते.
कथासंग्रहातील जन्नत, शंभुनाथ सिंह, पोर्‍या, अ…अफजलचा ह्या कथा बालकामगारांचे शोषण ठळकपणे समोर ठेवतात. बालकांना शिक्षण मिळणे प्राधान्याचे आहे, त्यांचे पुनर्वसन झाले पाहिजे त्यासाठीच्या योजना, चळवळी, क्रियाशीलता, इच्छाशक्ती, सुजाण नागरिक म्हणून त्याच्या जडणघडणीची आवश्यकता, प्राधान्य याबाबी प्रत्येक कथेतून पोळ खूप तळमळीने सांगतात. प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळे आयुष्यात आलेले मसुवर्णक्षणफही ते कथेच्या रूपात वाचकांना सांगतात, जे वाचकांसाठीदेखील प्रेरक आहेत .
आजच्या या डिजिटल युगात बोथट, बधिर झालेल्या संवेदना हे पुस्तक वाचून निश्चित जागृत होतील अशा शैलीत पोळ यांनी कामगार विभागातील अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवी संघटना इ.च्या साहाय्याने हाताळलेल्या बालमजूर मुक्तीच्या नाना वास्तव, करुण कथा लिहिल्या आहेत. मुळात पद कोणतेही असो वा नसो व्यक्ती ममाणूसपणाच्याफ तत्वाशी आंतरिक बांधील असली म्हणजे ती जेही करते ते पूर्णांशाने उत्तमच करते हे निश्चित.
बालकामगारांच्या संदर्भात काम करताना कितीतरी नवीन धक्कादायक, नैराश्य निर्माण करणार्‍या, हतबल, संताप वाटावा अशा अघोरी नवीन बाबी समोर येतात ज्यांची कल्पना सर्वसामान्य समाजघटकास अजिबात नसते. भीक मागणार्‍यांची टोळी, त्या मुलांचे विविध प्रकारचे शोषण, हाल, त्यात मुली असल्या तर आणखीच गुंतागुंतीचे अमानवी हिडीस प्रकार सर्रास बालकामगारांच्या बाबतीत सुरू असतात. आपले कर्तव्य किंवा नोकरी म्हणून बालकामगार मुक्तीचे काम करणारे शैलेंद्र पोळ नाहीत तर ते सामाजिक उत्तरदायित्व, राष्ट्रनिष्ठा असणारा सजग नागरिक, माणुसकीचे भान ठेवत देशाच्या भविष्याला शिक्षणाची, सक्षमतेची वाट दाखवणारे सुहृदयतेने काम करणारे तळमळीचे अधिकारी आहेत ही साक्ष कथा वाचताना पटत जाते. रत्नाकर गायकवाड यांसारखे कार्यक्षम, न्यायप्रिय, निर्णयक्षम तत्कालीन अधिकारी लाभल्यामुळे तर पोळ यांच्या बालकांची मजुरीतून सुटका आणि त्यांचे पुनर्वसन ह्या कार्यास अधिक गती मिळाली, असे मनोगत व प्रस्तावनेत उल्लेखित आहे.
बालमजुरीबाबत लोकजागृती, कायदे करून किंवा दोषींना शिक्षा ठोठावून ते वठणीवर येणार नाहीत तर त्यात सर्वांत महत्त्वाची निर्णायक भूमिका समाजाची व समाजाचा घटक म्हणून प्रत्येकाची आहे हे वारंवार पोळ मांडतात व त्यांची ती अपेक्षा योग्यच आहे. 1098 ह्या चाइल्ड हेल्पलाइन क्रमांकावर आपल्या पाहण्यात आलेल्या बालमजुरांची माहिती तात्काळ देऊन या मुलांची त्यांचे भविष्य नासवणार्‍या शोषणाच्या कचाट्यातून मुक्तता करता येऊ शकते. शासकीय नियम कायदे याबरोबरच सामाजिक सजगता यात वेगाने बदल घडवू शकते हे पोळ आपल्या लेखनातून स्पष्ट करतात जे अगदी रास्त आहे. पुस्तक हातात घेताना असणारा वाचक, पुस्तक वाचून खाली ठेवेल तेव्हा त्याच्या डोक्यात विचारांचे थैमान माजेल व स्वतःहून तो समाज, नागरिक म्हणून काहीतरी करण्यास सज्ज होईल ही खात्री वाटते. या कथासंग्रहाची निर्मिती जनजागृतीच्या शुद्ध उद्देशाने झाली आहे, असे लेखक म्हणतो आणि म्हणूनच साहित्याचे प्रयोजन इतरांना शहाणे, सजग करणे असते ते या कथासंग्रहातून साध्य होण्याबाबत खात्री वाटते.
-डॉ. प्रतिभा जाधव

पुस्तकाचे नाव- पोर्‍या (कथासंग्रह)
कवी- शैलेंद्र पोळ
प्रकाशक- मनोविकास प्रकाशन, पुणे
मुखपृष्ठ- चंद्रमोहन कुलकर्णी
प्रथम आवृत्ती- 15 ऑगस्ट 2021
एकूण पृष्ठ- 144
मूल्य- 170रु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *