निंबोणीच्या झाडामागे
चंद्र झोपला गं बाई
आज माझ्या पाडसाला
झोप का गं येत नाही॥
गाय झोपली गोठ्यात
घरट्यात चिऊताई॥
परसात वेलीवर
झोपल्या गं जाईजुई
मीट पाकळ्या डोळ्यांच्या
गाते तुला मी अंगाई ॥
आज माझ्या पाडसाला
झोप का गं येत नाही॥
देवकी नसे मी बाळा,
भाग्य यशोदेचे भाळी
तुझे दुःख घेण्यासाठी
केली पदराची झोळी
जगावेगळी ही ममता
जगावेगळी अंगाई॥
गाणे गायलेले आहे सुमन कल्याणपूर यांनी! ’बाळा गाऊ कशी अंगाई’ या चित्रपटासाठी मधुसूदन कालेलकर यांनी लिहिलेल्या गीताच्या गायिका सुमन कल्याणपूर आता आपल्यात नाहीत. सुरेल आवाजातील त्यांचे हे अंगाईगीत मराठी माणसांच्या घराघरांत पोहोचले. बाळाला झोप यावी म्हणून मातेच्या ओठावर हे गीत सहज यायचे. आजही हेच गीत बाळाला झोप यावी म्हणून गायले जाते किंवा ऐकवले जाते. सुमन कल्याणपूर यांनी आपल्या आवाजाने मातांना आणि त्यांच्या बाळांना आपलेसे केले. हे गीत घराघरांत गायले गेले, पुढेही गायले जाईल, याविषयी शंका नाही. सुमन कल्याणपूर यांचा गोड आवाज कोण विसरणार? आवाजानेच त्या घराघरांत पोहोचल्या होत्या. त्या आज नाहीत, पण त्यांच्या या गाण्याने त्या आपल्यातच आहेत आणि पुढेही राहतील. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर या गायिकांच्या समकालीन असणार्या सुमन कल्याणपूर यांनी समस्त भारतीय संगीत रसिकांवर मोहिनी घातली होती. त्यांनी प्रामुख्याने मराठी आणि हिंदी भाषांमध्ये गाणी गायली. याशिवाय त्यांनी बंगाली, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, राजस्थानी, ओडिया आणि पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये आपल्या सुरांचा ठसा उमटवला. संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी तीन हजारांहून अधिक गाणी ध्वनिमुद्रित केली. त्यात हिंदी चित्रपटसृष्टीतील 850 पेक्षा जास्त गाण्यांचा समावेश आहे. ज्या काळात लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यात मानधनाच्या मुद्द्यावरून वाद सुरू होता, तेव्हा सुमन कल्याणपूर यांनी रफींसोबत अनेक सदाबहार गाणी गायली. त्यांनी रफींसोबत सुमारे 140 पेक्षा जास्त द्वंद्वगीते गायली. त्यांनी रोशन, नौशाद, मदनमोहन, शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, कल्याणजी-आनंदजी, एस. डी. बर्मन आणि आर. डी. बर्मन यांसारख्या भारतीय संगीतविश्वातील सर्व दिग्गज संगीतकारांच्या हाताखाली काम केले. सुमन कल्याणपूर यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी ढाका (आजच्या बांगलादेशातील) येथे झाला. त्यांचे माहेरचे नाव सुमन हेमाडी असे होते. त्यांच्या घरात सुरुवातीपासूनच संगीतमय वातावरण होते. त्यांचे वडील शंकरराव आणि आई सीताबाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर गाण्याचे बालसंस्कार झाले. त्या पाच बहिणी आणि एक भाऊ. यात त्या सर्वांत मोठ्या होत्या. सन 1943 मध्ये त्यांचे कुटुंब ढाक्याहून मुंबईत आले. त्यांचे शालेय शिक्षण ’सेंट कोलंबा हायस्कूल’मध्ये पूर्ण झाले. गायनासह त्यांना चित्रकलेची आवड होती. त्यांनी पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या प्रसिद्ध सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्मध्ये प्रवेश घेतला होता. चित्रकलेचे शिक्षण घेत असतानाच कौटुंबिक मित्र आणि संगीत दिग्दर्शक पंडित केशवराव भोळे यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला गाणे हा फक्त एक छंद होता. मात्र, पुढे त्यांनी गानगंगेत स्वतःला झोकून देत उस्ताद अब्दुल रहमान खान आणि मास्टर नवरंग यांच्याकडून व्यावसायिक संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनी पहिल्यांदा शुक्राची चांदणी या मराठी चित्रपटासाठी गाणे ध्वनिमुद्रित केले होते. पण दुर्दैवाने काही कारणास्तव ते गाणे वगळण्यात आले. ’उगवली शुक्राची चांदणी’ हेच ते गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. याच गाण्याने त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीचा पाया रचला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी संगीतकार मोहम्मद शफी यांनी त्यांच्यातील प्रतिभा ओळखली. त्यांनी ’मंगू’ (1954) या चित्रपटात ’कोई पुकारे धीरेसे तुजेे’ हे गाणे सुमन कल्याणपूर यांच्याकडून गाऊन घेतले. हे त्यांचे रुपेरी पडद्यावरचे पहिले अधिकृत गाणे ठरले. याच काळात गझलसम्राट तलत महमूद यांनी सुमन यांचा आवाज एका कार्यक्रमात ऐकला आणि त्यांची शिफारस एचएमव्ही कंपनीकडे केली. त्यानंतर 1954 मध्येच आलेल्या ’दरवाजा’ चित्रपटात नौशाद यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली तलत महमूद यांच्यासोबत ’एक दिल दो हैं तलबगार’ हे द्वंद्वगीत गाऊन सुमन कल्याणपूर यांनी आपल्या कारकिर्दीला खरी गती दिली. मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचे अधिकृत पदार्पण ’पसंत आहे मुलगी’ या चित्रपटातील ’भातुकलीचा खेळ मांडिला’ या गाण्याने झाले, ज्याला वसंत प्रभू यांनी संगीत दिले होते. पुढे 1958 मध्ये रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या सुमन हेमाडीच्या सुमन कल्याणपूर झाल्या. संगीत क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ आणि ऐतिहासिक योगदानाची दखल घेऊन भारत सरकारतर्फे त्यांना 22 मार्च 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील तिसरा
सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासनातर्फे संगीत क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी दिला जाणारा अत्यंत मानाचा लता मंगेशकर पुरस्कार देऊनही त्यांना गौरविण्यात आले होते. सुरेल अजरामर ठेवा देऊन त्या आपल्यातून 31 मे 2026 रोजी निघून गेल्या. सन 1954 पासून त्या गात होत्या. त्यावेळी आणि त्यानंतरही पार्श्वगायन क्षेत्रात एकापेक्षा एक सरस अशा दिग्गज महिला गायिका होत्या. दहा ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांच्यासोबत त्यांची गाणी कमालीची लोकप्रिय ठरली. त्यामुळे त्या पाश्वर्र्गायन क्षेत्रात त्यांच्या समकालीन गायिकांना मागे टाकून क्रमांक एकच्या गायिका होतील असे वाटत असतानाच त्यांच्या गायनाला अचानक खंड पडला. त्यांनी स्वतःहूनच मधल्या काही काळात पाश्वर्र्गायन क्षेत्रापासून अंतर ठेवले होते. हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे मोठे नाव होत असतानाही सुमन कल्याणपूर यांनी मराठी भक्ती आणि भावगीतेही गायिली. मराठी रसिकांना त्यांच्या सुरेल गाण्याचा आनंदाचा ठेवा कायमस्वरूपी उपलब्ध आहे. मराठीतही अनेक संगीतकारांकडे त्यांनी आपली गायनसेवा बजावली, पण त्यातही दशरथ पुजारी आणि सुमन कल्याणपूर या जोडीने दिलेली गाणी लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली, राहत आहेत आणि राहतील. त्यातील ’निंबोणीच्या झाडामागे’ हे घराघरांत पोहोचलेले एक गाणे. दूरदर्शन येण्याच्याही आधी सगळ्यांच्या मनोरंजनाचे साधन केवळ रेडिओ होते. त्यातही ’आकाशवाणी’च्या महाराष्ट्रातील विविध केंद्रांनी मराठी साहित्य-संस्कृती क्षेत्राचा अमोल खजिना रसिकांपुढे सातत्याने खुला केला आणि मराठी रसिकांना या क्षेत्रातील नवनवीन प्रवाहाशी जोडलेले ठेवले. त्यामुळे ’आकाशवाणी’च्या सकाळच्या सत्रातील भक्तिगीते आणि अन्य वेळेतील भावगीते जेव्हा मराठी रसिक आवर्जून ऐकत असत, त्यावेळी गायिका सुमन कल्याणपूर अशी घोषणा झाल्यानंतर रसिकांचे कान आवर्जून टवकारले जात असायचे. त्यांचे ’निंबोणीच्या झाडामागे’ हे गाणे ऐकत ऐकत बाळ झोपी जायचे!
Behind the neem tree…