आ. फरांदे यांच्या पाठपुराव्याला यश; पूरपातळी तीन मीटरने कमी होणार
नाशिक : प्रतिनिधी
गोदावरी नदीच्या पुरामुळे दरवर्षी होणार्या नुकसानीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने होळकर पुलाखाली उभारण्यात येत असलेले मेकॅनिकल गेट अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. आमदार देवयानी फरांदे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा प्रकल्प मार्गी लागला असून, काम पूर्ण झाल्यानंतर ब्रिटिशकालीन सिमेंट बंधारा हटविण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरीतील पूरपातळी सुमारे तीन मीटरने कमी होऊन पाण्याचा जलद निचरा होण्यास मदत होणार आहे.
मंगळवारी (दि. 2) आमदार फरांदे यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेकॅनिकल गेट कार्यान्वित झाल्यानंतर होळकर पुलाखालचा सुमारे तीन मीटर उंचीचा बंधारा हटविण्यात येईल. त्यामुळे नदीची खोली आणि पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढणार असून, पूरस्थितीत निर्माण होणारा पाण्याचा फुगवटा कमी होणार आहे.
2008 मधील महापुरानंतर पूरनियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन (सीडब्ल्यूपीआरएस), पुणे यांनी केलेल्या अभ्यासात होळकर पुलाजवळील अडथळ्यांमुळे वरच्या भागात पूरपातळी वाढत असल्याचे स्पष्ट झाले होते. या अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्यात आली.
दरवर्षी सराफ बाजार, फूलबाजार, रामवाडी परिसर तसेच गोदाकाठावरील अनेक घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पूरपाणी शिरत असल्याने मोठे आर्थिक नुकसान होते. मेकॅनिकल गेट कार्यान्वित झाल्यानंतर या भागांतील पुराचा धोका कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाहणीदरम्यान आमदार फरांदे यांनी गोदाकाठ परिसरातील वाढत्या काँक्रिटीकरणाबाबतही चिंता व्यक्त केली. नैसर्गिक झरे बंद होणे आणि नदीपात्र उथळ होणे यामुळे पूररेषा वाढत असल्याचे सांगत आगामी सिंहस्थाच्या कामांमध्ये नदीचे खोलीकरण करण्याबाबत अधिकार्यांना सूचना केल्या.
यावेळी त्यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन रामकुंड परिसरात शुद्ध पाण्याचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी होळकर पुलाजवळ जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची मागणी केली. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रिटिशकालीन होळकर पुलाची तातडीने डागडुजी व आवश्यक दुरुस्ती करण्याची आवश्यकता त्यांनी
अधोरेखित केली.
गोदावरीच्या पुरामुळे नागरिक आणि व्यावसायिकांना अनेक वर्षांपासून मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मेकॅनिकल गेट कार्यान्वित झाल्यानंतर नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल आणि पूरनियंत्रणास मोठी मदत होईल. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
– आमदार देवयानी फरांदे
जलशुद्धीकरण प्रकल्पाचा प्रस्ताव
पाहणीनंतर आमदार फरांदे यांनी महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेतली. रामकुंडात शुद्ध पाण्याचा सातत्याने पुरवठा व्हावा यासाठी होळकर पुलाजवळ पूरपातळीच्या वर जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्याची मागणी त्यांनी केली. भाविकांना स्नान व धार्मिक विधींसाठी स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
Mechanical gate in final stages