भगवतीदेवी मंदिर राहणार 20 तास खुले

गावाबाहेरच्या देवी मंदिरात नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी

सिन्नर : प्रतिनिधी
येथील गावाबाहेरच्या भगवतीदेवी मंदिराच्या यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत मंदिर भाविकांना दर्शनासाठी पहाटे 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत, असे तब्बल वीस तास खुले राहणार आहे.

देवी मंदिराच्या परिसरात भरवली जाणारी यात्रा सिन्नर शहराची ओळख बनली आहे. सप्तशृंगगडावरून सोमवारी (दि.22) घटस्थापनेच्या दिवशी आणलेल्या ज्योतीने मंदिरातील दिवा प्रज्वलित करून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे. पहाटे पाच वाजता खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते मंदिरात येणाऱ्या पहिल्या ज्योतीचे पूजन केले जाणार आहे. घटी असणाऱ्या भाविकांकडून दैनंदिन दुर्गा सप्तशतीपाठ व देवी माहात्म्य वाचन केले जाणार आहे.
देवी मंदिरात नवरात्रात पाचव्या माळेला देवीच्या प्राणप्रतिष्ठेचा उत्सव साजरा केला जाणार आहे. नवमीच्या दिवशी होमहवन व यज्ञविधी होणार आहे. देशमुख मळ्यात यात्रेतील दुकानांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नगरपालिकेच्या वतीने ऐश्वर्या मंदिरासमोरच्या जागेत बचत गटांसाठी 20 व्यावसायिक स्टॉल उभारण्यात आले आहेक. मंदिरासाठी देशमुख कुटुंबाने त्यांच्या मालकीची जमीन दान दिली आहे. मंदिराच्या भोवताली असलेल्या देशमुख मळ्यातच यात्रा भरवली जाते. त्याठिकाणी प्रसाद, मिठाई, खेळणी, विविध उपयोगाच्या वस्तूंंची दुकाने, रहाटपाळणे थाटली आहेत.
ऐश्वर्या मंदिरापासून पुढे आयटीआय रोडला असणारी गावाबाहेरची देवी म्हणजे वणीच्या सप्तशृंगीचे प्रतिरूप आहे. निमजग्याची देवी म्हणूनदेखील देवीला संबोधले जाते. स्व. लालाशेठ चांडक, स्व. हरिश्चंद्र लोंढे, वसंत गवळी, प्रकाश वाजे, कृष्णाजी भगत, पुंजाभाऊ सांगळे, पत्रकार सुभाष जाजू यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिराचा 1992 मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला. ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली भगवतीदेवी मंदिराचे विद्यमान अध्यक्ष उद्योजक विवेक चांडक, माजी उपनगराध्यक्ष प्रमोद चोथवे यांच्या पुढाकारातून तीन वर्षांपूर्वी नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

1984 पासून आरती मंडळाकडून नित्य आरती

सन 1984 पासून देवी भगवती आरती मंडळाच्या वतीने वर्षभर दररोज सकाळी व रात्री साडेआठ वाजता मंदिरात आरती केली जाते. नवरात्र उत्सवाचे नियोजनदेखील आरती मंडळाच्या नेतृत्वाखालीच असते. घटी बसणाऱ्या भाविकांना दररोज फराळ, चहापाणी, तसेच त्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात येते. दसऱ्याच्या दिवशी सकाळी पाचपासून रात्री बारापर्यंत येणाऱ्या भाविकांना 1200 किलो रव्याचा महाप्रसाद वाटला जातो. खासदार राजाभाऊ वाजे, अरुण देशमुख, देवीदास इंगळे, बाळासाहेब देशमुख, दीपक सारंगधर, उत्तम पानसरे, विजय तेलंग, विठ्ठल माळी, सुरेश बोराडे, शशी कोठुरकर, कैलास गोसावी, पुजारी शोभा तनपुरे, संतोष तनपुरे आदी आरती मंडळाची जबाबदारी सांभाळतात.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *