नवरात्रोत्सवासाठी ज्योत नेण्याची परंपरा कायम

अनवाणी पाचशे किमी प्रवास; गडावर पाच दिवसांपासून भाविकांची गर्दी

सप्तशृंगगड : वार्ताहर
नवरात्रोत्सवास आजपासून (दि. 22) प्रारंभ होत आहे. राज्यातील सुप्रसिद्ध देवी मंदिरांच्या ठिकाणाहून अखंड ज्योत आणण्याची परंपरा आजही कायम आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील देवीभक्त नाशिकच्या सप्तशृंगगडावरून अखंड ज्योत नेण्यासाठी दाखल होत आहेत. सप्तशृंगीदेवी मंदिर भाविकांनी गजबजले आहे. अनवाणी संबंधित मंदिरापर्यंत ज्योत नेऊन घटस्थापना केली
जाते.
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ सप्तशृंगीदेवी मंदिर नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे. वर्षभर गडावर भाविकांची गर्दी असते. मात्र, नवरात्रोत्सवाचा उत्साह अधिक दिसतो. दर्शनासाठी भाविक येत असतात. मात्र, दुसरीकडे नवरात्रीच्या पाच- सहा दिवस आधी महाराष्ट्रातील घटस्थापना करणारे मित्रमंडळ सप्तशृंगगडावर येत अखंड ज्योत घेऊन जातात. गेल्या चार-पाच दिवसांपासून गडावर ज्योत नेणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा आजही कायम आहे.
राज्यातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांचे कार्यकर्ते वाजतगाजत सप्तशृंगीदेवीचा गजर करत सप्तशृंगगडावर दाखल होत आहेत. शारदीय नवरात्रोत्सव सुरू होत असल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांसह खान्देशमधील भाविक सप्तशृंगगडावर दाखल होत आहेत. सप्तशृंगगडावरून मशालीद्वारे ज्योत आपापल्या गावी पादत्राणे न घालता घेऊन जाण्याची परंपरा आहे. यात मालेगाव, धुळे, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, तळोदा, यावल, जामनेर, बीड, तसेच गुजरातमधील भाविकांचे प्रमाण अधिक आहे. विशेष म्हणजे, रात्रीच्या वेळीही त्यांचा पायी प्रवास सुरू असतो. नवरात्रोत्सवास सोमवारपासून प्रारंभ होत असल्याने घटस्थापनेच्या अखंड दिव्यासाठी सप्तशृंगीदेवीच्या गडावरील ज्योतीला विशेष महत्त्व आहे.
नवरात्रोत्सव मंडळे घटस्थापनेपूर्वी मंदिरात येऊन भोगीपूजा करतात. भवानी ज्योत प्रज्वलित करून गावी नेतात. गडावर ज्योत घेण्यासाठी मंदिरात पूजा करून ती प्रज्वलित केली जाते. यानंतर ज्योत घेणारा असतो. तो अनवाणी गड उतरून गावी मार्गक्रमण करतो. अशावेळी मंडळातील अनेक कार्यकर्ते त्याच्यासोबत असतात. पहिल्या भाविकाने ज्योत घेतल्यानंतर ती काही किलोमीटर चालल्यानंतर दुसरा भाविक ज्योत घेऊन चालत असतो. रस्त्यात कुठेही थांबत नाहीत. या प्रवासात ज्योत कुठेही विझू दिली जात नाही. ज्योत हळूहळू एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे अशी जोपर्यंत गाव येत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया चालूच असते. शेवटी ज्योत गावात आणल्यानंतर विधिवत घटस्थापना करून ज्योत उभी केली जाते. ती नऊ दिवस प्रज्वलितच ठेवली जाते. दिवसरात्र ज्योतीला तेल टाकून निरंतर प्रकाशमान असते.

भाविकांचे नवरात्रोत्सव कालावधीत हाल होऊ नयेत यासाठी प्रशासनाने कोजागरी उत्सवापर्यंत घाटरस्त्यातील सर्व कामे पूर्णपणे थांबवली आहेत. उत्सव कालावधीत 24 तास बससेवा, वैद्यकीय सेवा, पोलीस बंदोबस्त राहणार आहे. आई भगवतीचे दर्शन 24 तास खुले ठेवले आहे.
– राजेश गवळी, सदस्य, ग्रामपंचायत, सप्तशृंगगड

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *