भोंदू खरातला पुन्हा पाच दिवसांची कोठडी

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले, सुनावणीदरम्यान तांत्रिक बिघाड

नाशिक : प्रतिनिधी
भोंदूगिरीच्या माध्यमातून महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अशोक खरात याला न्यायालयाने पुन्हा पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कोठडी 18 एप्रिलपर्यंत देण्यात आली आहे.
यापूर्वीची पोलीस कोठडी संपल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव खरातला मंगळवारी (दि. 14) प्रत्यक्ष न्यायालयात न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान सुरुवातीला तांत्रिक अडचणीमुळे न्यायालयाचा आवाज आरोपीपर्यंत पोहोचत नसल्याने काही काळ कामकाज ठप्प झाले होते. तांत्रिक बिघाड दूर झाल्यानंतर सुनावणी पुन्हा सुरू करण्यात आली. यावेळी न्यायालयाने पोलिसांकडून मारहाण झाली का, अशी विचारणा केली असता खरातने मारहाण झालेली नसल्याचे सांगितले. दरम्यान, बचाव पक्षाचे वकील अ‍ॅड. सचिन भाटे यांनी विरोध करत यापूर्वीच्या गुन्ह्यांमध्येही समान युक्तिवाद करण्यात आला असून, तपास पूर्ण झालेला आहे, त्यामुळे नव्याने कोठडीची गरज नसल्याचे नमूद केले. मात्र, सदर गुन्हा वेगळ्या महिलेच्या तक्रारीवर आधारित असल्याने तपास आवश्यक असल्याचे सरकारी पक्षाने स्पष्ट केल्यानंतर न्यायालयाने आरोपीस पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

सरकारी वकिलांचा युक्तिवाद

सरकारी वकील अ‍ॅड. शैलेंद्र बागडे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, आरोपी स्वतःला देवाचा अवतार असल्याचे भासवून महिलांना जाळ्यात ओढत होता. त्यांना तांब्याच्या भांड्यातील पाणी व पेढा देत असे, ज्यामध्ये गुंगीचे औषध मिसळलेले असायचे. त्यानंतर माझ्याशी संबंध ठेवल्यास तू पवित्र होशील, असे सांगून तो महिलांचे लैंगिक शोषण करत होता. या प्रकरणात वापरलेल्या औषधांचा तसेच भोंदूगिरीसाठी वापरलेल्या वस्तूंचा तपास करणे आवश्यक असल्याने पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली.

Bhondu Kharat remanded in custody for five days again

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *