नवी दिल्ली :
कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे पेट्रोल 18 आणि डिझेल 35 रुपयांनी प्रतिलिटर महाग होण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाचे दर वाढले तरीही देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. त्यामुळे कंपन्यांना मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पश्चिम बंगालसह पाच राज्यांच्या निवडणुका संपताच कंपन्या पेट्रोल, डिझेलचे दर वाढवण्याची शक्यता आहे.
कच्चे तेल महागल्याने कंपन्यांना प्रतिलिटर पेट्रोलवर 18 व डिझेलवर 35 रुपये नुकसान होत आहे. मागील महिन्यात तीन कंपन्यांना जवळपास 2400 कोटी नुकसान सहन करावे लागले. उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केल्यानंतर हे नुकसान 1600 कोटींपर्यंत घसरले. प्रत्येक दहा डॉलरच्या वाढीनंतर नुकसान सहा रुपये प्रतिलिटरने वाढत आहे.
भारत आपल्या कच्च्या तेलाच्या गरजेपैकी अंदाजे 88% आयात करतो. यापैकी 45% मध्यपूर्वेकडून आणि 35% रशियाकडून येते. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती केवळ तेल कंपन्यांसाठीच नव्हे तर देशाच्या चालू खात्यातील तुटीसाठीदेखील धोकादायक ठरत आहेत. 2026 च्या पहिल्या तिमाहीपर्यंत ही तूट 20 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकते असा अंदाज आहे.
सरकारी महसुलात तेलावरील उत्पादन शुल्काचा वाटा सातत्याने कमी होत आहे. 2017 च्या आर्थिक वर्षात ते 22% होते आणि आता ते केवळ 8% पर्यंत खाली आले आहे. सरकारने संपूर्ण उत्पादन शुल्क काढून टाकले तरी सध्याच्या किमतीनुसार तेल कंपन्यांचे नुकसान पूर्णपणे भरून निघणार नाही. ऑगस्ट 2022 नंतर प्रथमच अमेरिकेत पेट्रोलची सरासरी किंमत प्रति गॅलन 4 डॉलरच्या वर गेली आहे. पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका यांसारख्या अनेक शेजारी देशांनीही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत.
Will petrol become more expensive by Rs 18 and diesel by Rs 35?