आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

कळवण तालुक्यातील घटना, तीन जणांचे निलंबन; अन्नाच्या गुणवत्तेवर संशय

नाशिक : प्रतिनिधी
आदिवासी विद्यार्थ्यांचे उपोषण आणि आंदोलनाने वातावरण तापलेले असतानाच कळवण तालुक्यातील विसरवाडी आश्रमशाळेतील आठवर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. इयत्ता दुसरीत शिकणार्‍या सृष्टी सूर्यवंशी हिची शुक्रवारी (दि. 3) मध्यरात्री अचानक प्रकृती बिघडली. उलटी, चक्कर आणि तापाचा त्रास झाल्यानंतर तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर प्रकल्प विकास अधिकारी भगवान निकम यांच्यासह अधीक्षक स्मिता गायकवाड, मुख्याध्यापक जिभाऊ पवार यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, मृत विद्यार्थिनीचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर मोठ्या प्रमाणात जमाव जमला होता. यावेळी काहीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यू आणि दुरवस्थेविरोधात नाशिकमध्ये गेल्या पंधरवड्यापासून आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर सृष्टीच्या मृत्यूची घटना समोर आल्याने आंदोलकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात धाव घेतली.
सृष्टीच्या मृत्यूमागे आश्रमशाळेत पुरविण्यात येणार्‍या सेंट्रल किचनच्या अन्नाची गुणवत्ता कारणीभूत असण्याचा संशय आंदोलकांनी व्यक्त केला. याप्रकरणी सेंट्रल किचन, आश्रमशाळेचे अधीक्षक व मुख्याध्यापकांसह संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
आश्रमशाळेच्या अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार, सकाळी सृष्टीला ताप असल्याने औषधोपचार करण्यात आले होते. त्यावेळी तिची प्रकृती गंभीर नव्हती. रात्री प्रकृती अचानक बिघडल्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी ‘डेथ ऑन अरायव्हल’ असा अहवाल दिल्याचे त्यांनी सांगितले. सृष्टीचा मृतदेह विच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर आंदोलनकर्ते, विद्यार्थीआणि नातेवाईक मोठ्या संख्येने तेथे दाखल झाले. यामुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी सुमारे शंभर पोलिस कर्मचारी तसेच राज्य राखीव दलाची तुकडी तैनात करण्यात आली. आदिवासी विभागाच्या आयुक्त लीना बनसोड आणि पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आंदोलक तसेच सृष्टीचे वडील ओंकार सूर्यवंशी यांच्याशी चर्चा केली. दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले. दरम्यान, शवविच्छेदन अहवाल येण्यापूर्वीच प्रकल्प विकास अधिकारी भगवान निकम यांच्यासह तिघांचे निलंबन करण्यात आले.
घटनाक्रम
♦  गुरूवारी (दि.3) सायंकाळी साडेआठ वाजता सृष्टीने जेवण केले
♦  शुक्रवारी (दि.4) रात्री दीड वाजता सृष्टीला उलट्या झाल्या.
♦  पावणेदोन वाजता कळवण उपजिल्हा रूग्णालयात सृष्टीला दाखल केले.
डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.
♦  सकाळी 8 वाजता शवविच्छेदनासाठी सृष्टीला जिल्हा रूग्णालयात आणण्यात आले.
♦  साडेनऊ वाजता आदिवासी संघटनांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेतली
दहा वाजता पोलीसांनी जिल्हा रूग्णालयात बंदोबस्त लावला
♦  साडेबारा वाजता आदिवासी आयुक्त लीना बनसोड यांच्याकडून जिल्हा रूग्णालयास भेट
♦  1 वाजता पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जिल्हा रूग्णालास भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
♦  1.30 वाजता आदिवासी संघटनांकडून आश्रमशाळेच्या अधिक्षक, मुख्याध्यापक यांच्या निलंबनाची मागणी
♦  साडेतीनला आदिवासी आयुक्तालयाकडून अधिक्षक, मुख्याध्यापकांचे निलंबन

अधीक्षिका, मुख्याध्यापक, शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित

सृष्टी सूर्यवंशीचा मृत्यू झाल्यानंतर आदिवासी प्रशासनाने कठोर भूमिका घिेतली आहे. अधीक्षिका स्मिता गायकवाड, मुख्याध्यापक जिभाऊ पवार, शिक्षण विस्तार अधिकारी भगवान निकम या तिघांवर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सखोल तपासासाठी समिती नेमण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली.

मध्यरात्री अचानक प्रकृती खालावली

गुरुवारी रात्री सुमारे आठ वाजता विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थी झोपले. मात्र, रात्री एक वाजल्यानंतर सृष्टीला अचानक त्रास सुरू झाला. तिला उलटी, चक्कर आणि ताप आला. रात्री दीडच्या सुमारास तिला स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा शासनासाठी सर्वांत महत्त्वाची आहे. सृष्टीच्या मृत्यूचे खरे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल. विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या घटना टाळण्यासाठी सर्व अधिकारी प्रयत्नशील आहेत. – लीना बनसोड, आदिवासी आयुक्त

सध्या ताप आणि उलट्यांच्या त्रासानंतर तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच स्पष्ट होईल. या घटनेनंतर निर्माण झालेला लोकक्षोभ लक्षात घेऊन आश्रमशाळेतील संबंधित कर्मचार्‍यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे.
– दिनकर पावरा, अपर आयुक्त

सृष्टीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. सेंट्रल किचनच्या अन्नामुळे अनेक विद्यार्थ्यांचे मृत्यू होत असल्याचा आमचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी.
– ओंकार सूर्यवंशी, सृष्टीचे वडील

शालेय स्तरावर मुलीवर उपचार करण्यात आले. मात्र, तिच्या मृत्यूचे नेमके कारण समजून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यासोबत तिचे वडील होते. शाळेतील पाणी, अन्नाची तपासणी करण्यात आली आहे. या घटनेची खातेनिहाय चौकशी करण्यासाठी समिती गठित केली आहे. याप्रकरणी निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल.
– डॉ. काश्मिरा संख्ये, प्रकल्प अधिकारी

Death of a female student from an ashram school

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *