पंचवटी : प्रतिनिधी
ऐतिहासिक काळाराम मंदिरात चैत्र शुद्ध नवमीला
जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय, जय सीता राम सीता अशा नामघोषात गुरुवारी (दि.26) दुपारी बारा वाजता श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी काळारामाचे दर्शन घेतले. परिसरातील गोराराम, बायकांचा राम, श्रीराम अशा विविध मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यावेळी प्रभू श्रीरामाचा अभिषेक करून पारंपरिक वस्त्रे आणि सोन्याच्या दागिन्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. यावेळी भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. काळाराम मंदिरासह शहरातील विविध छोट्या मंदिरांमध्येही भाविकांनी रामनामाचा गजर करत श्रीरामाचे मनोभावे दर्शन घेतले.
पहाटे पाच वाजता काकड आरती राघवेंद्र पुजारी यांच्या हस्ते, सात वाजता रामाची महापूजा उत्सवाचे मानकरी नरेंद्र बुवा पुजारी यांच्या हस्ते आचमन प्राणायाम करून तिथी वार नक्षत्र याचा उल्लेख करून प्रधान संकल्प अंतर मातृका बहिर्मातृका पुरुष सूक्त ज्ञानसुविधीने रामरायाची राजोपचार पूजा होऊन रामरायाला अभ्यंगस्नान, प्राचीन अलंकार, महावस्त्र नेसवण्यात आले. त्यानंतर दुपारी बाराच्या ठोक्याला मंदिरातील मुख्य गाभार्यातील श्री काळाराम यांच्या मूर्तीसमोरील पडदा हटवून रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या पाळण्यातील प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीला झोका देऊन हलविण्यात आले. राम जन्मानंतर श्रीखंड पंजरी याचा प्रसाद दाखवून तो भाविकांना वितरित करण्यात आला.
यावेळी हजारो रामभक्तांनी श्रीरामाचा एकच जल्लोष करीत प्रभू रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय अशा घोषणा देत संपूर्ण मंदिर परिसर दणाणून सोडला. काळाराम मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येऊन फुलांनी सजावट केल्याने मंदिराच्या वैभवात भर पडली होती. रामजन्म झाल्यावर नागरिकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली होती. रात्री अन्नकूटमध्ये भगवान रामचंद्रांना 56 पदार्थांचा नैवेद्य (भोग) दाखविण्यात आला. या अन्नकूटसाठी मंदिराचे असलेल्या पुजार्याच्या प्रत्येक घरातून एक पदार्थ बनवून आणण्यात आला होता. सर्व पूजेचे पौरोहित्य प्रणव पुजारी, आशुतोष पुजारी, श्री महंत सुधीरदास महाराज यांनी केले.
भाविकांनी काळारामाचे दर्शन घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत लांबच लांब रांगा लावल्या होत्या. संस्थानतर्फे या ठिकाणी महाप्रसादाचे वाटपदेखील करण्यात आले. यावेळी झालेल्या महाआरतीत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार सीमा हिरे, महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, माजी खासदार समीर भुजबळ, हेमंत गोडसे, डॉ. दिनेश बच्छाव, सुधाकर बडगुजर, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, विश्वस्त मंदार जानोरकर, धनंजय पुजारी, अॅड. अक्षय कलंत्री, राघवेंद्र पुजारी, शांताराम अवसरे, शुभम मंत्री, मिलिंद तारे, अमित कोठावदे, कौशिक कोठिया, अॅड. अजय निकम आदी मान्यवर सहभागी झाले होते. भाविकांच्या मांदियाळीत रामाचा जयघोष करत ढोल-ताशांचा गजर केल्याने अवघा परिसर रामनामाने दुमदुमून गेला होता. सकाळी मंदिरात अभिषेक, नित्यपूजन झाले. त्यानंतर दया कुलकर्णी यांचा कीर्तन, मनकामेश्वर भक्त मंडळाचा भजन कार्यक्रम झाला. यावेळी भाविकांनी राम मंदिरात रामरक्षा पठण केले.
Birth anniversary celebrated at Kalaram temple amidst chants of ‘Siyavar Ramchandra Ki’