डबल एबी फॉर्ममुळे सिडकोत भाजपा उमेदवारांची कोंडी

प्रभाग 25, 26 मध्ये एबी फॉर्म बाद; प्रभाग 29 मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा

सिडको : विशेष प्रतिनिधी
नाशिक महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सिडको विभागात भारतीय जनता पक्षातील उमेदवारीचा गोंधळ चिघळला असून, डबल एबी फॉर्मच्या प्रकरणामुळे पक्ष अडचणीत सापडला आहे. प्रभाग क्रमांक 25, 26, 27 आणि 29 मध्ये उमेदवारीवरून मोठा वाद निर्माण झाला असून, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी हस्तक्षेप करत काही उमेदवारांचे एबी फॉर्म अवैध ठरवले, तर काही हरकती फेटाळून लावल्या आहेत.

प्रभाग क्रमांक 25 मध्ये भाजपाकडून भाग्यश्री ढोमसे, संगीता पाटील, हर्षा बडगुजर आणि साधना मटाले यांना एबी फॉर्म देण्यात आले होते. मात्र, दोन जागांसाठी चार एबी फॉर्म दिल्याने गोंधळ निर्माण झाला. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निर्णय देत भाग्यश्री ढोमसे आणि संगीता पाटील यांचे एबी फॉर्म अवैध, तर हर्षा बडगुजर आणि साधना मटाले यांचे एबी फॉर्म वैध ठरवले.
या निर्णयानंतर भाग्यश्री ढोमसे आणि संगीता पाटील अपक्ष उमेदवारी करणार की नामनिर्देशन अर्ज मागे घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे भाजपातील अंतर्गत नाराजी उफाळून आली. नाराज झालेल्या भाग्यश्री ढोमसे आणि रवि पाटील यांची भाजपाचे शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याशी शाब्दिक चकमक झाली. संगीता पाटील यांचे पती रवि पाटील यांनी खानदेशी कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत जाब विचारला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून आयाराम-गयारामांना उमेदवारी दिल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपाचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांना डबल एबी फॉर्म देण्यात आले होते. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म अवैध ठरवत दीपक बडगुजर यांच्या उमेदवारीला मान्यता दिली. विशेष म्हणजे, दीपक बडगुजर हे प्रभाग क्रमांक 25 आणि 29 मधून भाजपाकडून उमेदवारी करणार असल्याची चर्चा आहे. दुसरीकडे, मुकेश शहाणे हे अपक्ष उमेदवारी करण्यावर ठाम असल्याचे समजते. त्यामुळे प्रभाग 29 मधील राजकीय वातावरण चांगलेच
तापले आहे.
प्रभाग क्रमांक 26 (क) मधून भाजपाच्या माजी नगरसेविका अलका अहिरे आणि पुष्पावती पवार या दोघींनाही एबी फॉर्म देण्यात आले होते. मात्र, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी अलका अहिरे यांचा अर्ज वैध, तर पुष्पावती पवार यांचा अर्ज अवैध ठरवला.
प्रभाग क्रमांक 27 मधून भाजपाच्या माजी नगरसेवकांच्या पत्नी प्रियांका दोंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा प्रशांत खरात यांनी अतिक्रमणाची हरकत नोंदवली होती. मात्र, निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी ही हरकत
फेटाळून लावली. याच प्रभागातून भाजपाच्या माजी नगरसेविका कावेरी घुगे यांच्याविरोधात प्रतिपक्ष उमेदवार किरण दराडे यांनी अतिक्रमणाबाबत तक्रार दाखल केली होती. ही तक्रारही फेटाळून लावल्याने कावेरी घुगे यांचा अर्ज वैध ठरवण्यात आला आहे.
निवडणूक नियमांनुसार एकाच प्रभागात डबल एबी फॉर्म दिले गेले असल्यास, ज्यांचा नामनिर्देशन अर्ज आधी दाखल झाला असेल त्यांचा एबी फॉर्म ग्राह्य धरला जातो, तर दुसर्‍याचा एबी फॉर्म अवैध ठरवला जातो. याच निकषांवर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी संबंधित निर्णय दिले आहेत.
डबल एबी फॉर्म, उमेदवारी रद्द, अपक्ष लढतीची तयारी आणि थेट आरोप-प्रत्यारोपांमुळे सिडको विभागातील भाजपाचे निवडणूक व्यवस्थापन पूर्णतः कोलमडल्याची चर्चा असून, या अंतर्गत वादाचा थेट फटका पक्षाला बसणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

मतदार मायबाप माझ्यासोबतच आहेत. मला कोणताही राजकीय वारसा नाही. मायबाप मतदारराजा हीच माझी संपत्ती आहे. माझा एबी फॉर्म चोरून नेण्यात आला असून, माझा विश्वासघात करण्यात आला आहे. माझ्या प्रभागातून विधानसभेचीच पुनरावृत्ती होईल. एबी फॉर्म जरी बाद झाला असला तरी माझा निवडणूक अर्ज वैध आहे. मी निवडणूक लढविणार असून, याबाबत लवकरच माध्यमांशी संवाद साधणार आहे.
– मुकेश शहाणे, माजी नगरसेवक

भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांनी दिलेले एबी फॉर्म अधिकृतच असून, जे काही झाले ते पक्षाच्या नियमानुसारच आहे. पक्षाचा निर्णय मान्य करावा लागेल.
– सुधाकर बडगुजर, माजी नगरसेवक

BJP candidates in CIDCO face dilemma due to double AB form

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *