भाजपा शहराध्यक्ष सुनील केदार यांचा नाराजीनामा!

पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चेनंतर राजीनामा मागे

नाशिक : प्रतिनिधी
महापौर आणि उपमहापौर पदासाठी सुचविलेल्या नावांवर विचार न केल्यामुळे नाराज झालेल्या महानगर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांनी मंगळवारी रात्री भाजपाकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठवून दिला. मात्र, दुसर्‍याच दिवशी प्रदेश पातळीवरील नेत्यांशी चर्चा झाल्यानंतर समाधान झाल्याने आपण राजीनामा मागे घेत असल्याचे केदार यांनी सांगितले. या घडामोडींमुळे भारतीय जनता पार्टीतही अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याचे बोलले जात आहे.
नाशिक महापालिकेत भारतीय जनता पार्टीने 72 जागा मिळविल्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदासाठी मोठी रस्सीखेच निर्माण झाली होती. महापौरपद सर्वसाधारण महिला राखीव असल्यामुळे महापौरपदावर पक्षातील दहा नगरसेविकांनी दावा ठोकला होता. स्थानिक पातळीवर निर्णय होत नसल्याने सुनील केदार यांनी स्थानिक सर्वांशी चर्चा करून काही नावे प्रदेश पातळीवर पाठविली होती. परंतु, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत महापौरपदासाठी प्रभाग सातच्या नगरसेविका हिमगौरी आडके-आहेर आणि उपमहापौरपदासाठी माजी आमदार बाळासाहेब सानप यांचे चिरंजीव मच्छिंद्र सानप यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दुपारी सर्वांनी अर्ज भरण्याची प्रक्रिया पार पाडल्यानंतर सायंकाळी उशिरा महानगर अध्यक्ष सुनील केदार यांनी आपण सुचविलेल्या नावांवर विचारच न केल्याचे म्हणत पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्यामुळे भारतीय जनता पार्टीत खळबळ उडाली होती. परंतु, दुसर्‍याच दिवशी त्यांनी आपली प्रदेश पातळीवरील नेते मंडळींशी चर्चा झाली असून, काही गोष्टींमध्ये जी नाराजी होती ती दूर झाल्याने आपण राजीनामा मागे घेत असल्याचे सांगितले. शहराध्यक्षांच्या या राजीनामा नाट्यामुळे मात्र, भारतीय जनता पार्टीमध्येही सारे काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. महापालिकेत निर्विवाद सत्ता मिळाल्यानंतर भारतीय जनता पार्टीतील अंतर्गत संघर्ष यानिमित्ताने उघड झाला आहे.

मंत्री महाजनांचा इन्कार

महानगर अध्यक्ष सुनील केदार यांनी राजीनामा दिला आणि तो नंतर मागेही घेतला. एवढी घडामोड होऊनही कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी मात्र असे काही राजीनामा नाट्य घडलेले नाही, असे सांगत सुनील केदार यांच्या राजीनाम्याचे वृत्त फेटाळून लावले.

ज्या कारणांमुळे मी भाजप नाशिक महानगर जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्या विषयांवर प्रदेश भाजपबरोबर माझी सविस्तरपणे चर्चा झाली आहे. माझे समाधान झाले आहे. प्रदेश भाजपच्या सूचनेनुसार मी माझा राजीनामा मागे घेतला आहे.
– सुनील केदार, अध्यक्ष, भाजप नाशिक महानगर जिल्हा

BJP city president Sunil Kedar’s letter of displeasure!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *