नगररचनाच्या अभियंत्यास शिवीगाळ; मोबाइल हिसकावत फेकला
नाशिक : प्रतिनिधी
नाशिक महापालिकेतील सत्ताधारी नगरसेवक काही दिवसांपासून सतत वादात सापडत आहेत. याआधी सिंहस्थ कामातील टक्केवारीसाठी ठेकेदाराला पंचवटीतल्या काही नगरसेवकांनी त्रास दिल्याचे समोर आले होते. यानंतर आता पुन्हा नाशिकरोडचे भाजप नगरसेवक सतीश निकम यांनी त्यांची वादग्रस्त फाइल मार्गी लावण्यासाठी नगररचना विभागातील कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरे यांना शिवीगाळ व धमकी देत त्यांच्यावर हात उगारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. 12) घडली. महापालिकेत या घटनेने खळबळ उडाली आहे. भामरे यांनी तत्काळ स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज मनपा आयुक्तांकडे केला आहे.
निकम यांनी शिवीगाळ आणि अरेरावीची भाषा करत, मारहाणीची धमकी दिल्याची तक्रार भामरेंनी आयुक्तांकडे केली आहे. या घटनेमुळे मानसिक तणावात गेलो असून, माझा स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज तातडीने मंजूर करावी, अशी मागणी भामरेंनी आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे केली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारामुळे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी धास्तावले आहेत. शुक्रवारी दुपारी संबंधित नगरसेवकाने थेट नगररचना विभाग गाठून कामाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यांनी कनिष्ठ अभियंता प्रदीप भामरे यांच्याकडे वादग्रस्त फाइलबाबत विचारणा केली. परंतु भामरे फोनवर बोलत असल्याचा राग येऊन निकम व भामरे यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली.संतापात निकम यांनी भामरेंचा फोन हिसकावून फेकून दिला. त्यानंतर हात उगारला तसेच भामरेंना शिवीगाळ केल्याने नगररचना विभागात तणाव निर्माण झाला. या प्रकारानंतर
महापालिका वर्तुळात खळबळ उडाली. जवळपास 10 ते 15 मिनिटे दोघांमध्ये वाद सुरू होता. काही ज्येेष्ठ नगरसेवकांनी धाव घेत, हा वाद मिटवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, निकम यांचे नगररचना विभागात एक प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्या प्रकरणावरून निकम आणि भामरेंमध्ये राडा झाला. हा वाद हमरीतुमरीवर जाऊन पोहोचला.त्यामुळे महापालिकेत एकच धावपळ उडाली.
सोमवारी कर्मचारी संघटनेचे आंदोलन
या प्रकारामुळे महापालिकेत लोकप्रतिनिधी विरुद्ध अधिकारी यांच्यात पुन्हा संघर्ष उफाळून आला आहे. तसेच हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाणार असल्याचे बोलले जात आहे. यानिमित्ताने लोकप्रतिनिधी विरुद्ध प्रशासन असा वाद उफाळून आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 15 जून) महापालिका कर्मचारी संघटनेने आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
संबंधित अधिकारी नेहमी उडवाउडवीची उत्तरे देत होते. मी कामगार क्षेत्रात काम करणारा असल्याने शुक्रवारी अधिकार्यांना विचारणा केली. मात्र, त्यांनी रिस्पेक्ट दिला नाही. त्यामुळे किरकोळ स्वरूपाचा वाद झाला.
– सतीश निकम, नगरसेवकमाझ्या वैयक्तिक कारणामुळे मला अनेक दिवसांपासून स्वेच्छानिवृत्ती घ्यायची होती. शुक्रवारी झालेल्या वादाचा याच्याशी काहीही संबंध नाही. गेल्या 27 वर्षांपासून महापालिकेत विविध विभागांत काम केले आहे.
– प्रदीप भामरे, कनिष्ठ अभियंता
BJP Corporator’s High-Handedness