नाशिक : प्रतिनिधी
साधुग्राममधील अठराशे झाडांवरील सुनावणी उच्च न्यायालयात पुन्हा लांबणीवर गेली आहे. शुक्रवारी (दि.12) याप्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार होती. मात्र वृक्षतोडीवरील सुनावणी पुन्हा लांबली असून, 15 जुलै रोजी आता सुनावणी घेतली जाणार आहे. ही माहिती याचिकाकर्ते अॅड. नितीन पंडित यांनी दिली.
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधुग्राम येथील झाडे तोडण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला होता. यानंतर शहरातील पर्यावरणप्रेमी कमालीचे आक्रमक झाले होते. मनसे, ठाकरे सेनेसह सत्ताधारी शिंदेसेनेनेदेखील याविरोधात आंदोलन करत या निर्णयाला तीव्र विरोध केला होता. महापालिकेने हा निर्णय मागे घ्यावा याकरिता पंचवटीतील पलुस्कर सभागृहात प्रारंभी सुनावणी घेतली असता, हजारो नागरिकांनी त्यावर हरकती घेतल्या. त्यानंतर हे प्रकरण थेट उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयात याचिका दाखल करूनही त्यावरील सुनावणी सातत्याने लांबणीवर पडत असल्याचे चित्र आहे. याप्रकरणी सुनावणी कधी होईल व झाडे तोडण्यावर निबर्ंध कधी घातले जातील, याकडे पर्यावरणप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.
Hearing on Tapovan tree felling now on July 15.