नाशिक-छ. संभाजीनगर महामार्ग दोन तास ठप्प; ग्रामस्थ संतप्त
विंचूर : प्रतिनिधी
विंचूर (ता. निफाड) येथील जिल्हा परिषद शाळेची जागा खासगी व्यक्तीने खरेदी केल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी साडेदहाला सरपंच सचिन दरेकर यांच्या नेतृत्वाखाली संतप्त विंचूरकर ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद शाळतील मुलांनी नाशिक- छत्रपती संभाजीनगर महामार्ग सुमारे दोन तास रोखून धरला. संबंधित व्यक्तीसह खरेदीखत बनविणार्या अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली.
निवासी नायब तहसीलदारांनी सदर सातबारा उतारा रद्द करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे सात ते आठ किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. येथील तीनपाटी भागात जिल्हा परिषद शाळेची जुनी इमारत आहे. याचा गट नंबर 627 चे खरेदीखत मधुकर रामचंद्र गायकर (निमगाव वाकडा) यांनी केल्याची माहिती समोर आली. ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. खरेदीखताची नोंद 7/12 उतार्यावर होऊ नये, यासाठी आंदोलन झाले. यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे यांनी संताप व्यक्त करीत लोकांना शाळेसह मंदिराच्या जागा कमी पडत असल्याची खंत व्यक्त केली. संबंधितांना ग्रामस्थांनी धडा शिकवला पाहिजे, असे मत व्यक्त केले. माजी उपसभापती संजय शेवाळे यांनी संबंधितांना विंचूरमध्ये पाय ठेवू देऊ नका, असे आवाहन केले. कैलास सोनवणे, विलास गोरे, किशोर पाटील, किशोर जेऊघाले आदींनी मनोगतातून ही केवळ शाळेची जागा नसून, आपल्या गावातील शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क आणि उज्ज्वल भविष्याशी निगडित असलेला संवेदनशील प्रश्न आहे. गावाच्या विकासाबरोबरच शिक्षणाचे पवित्र स्थान अबाधित राहणे ही सामूहिक जबाबदारी असल्याच्या भावना
व्यक्त केल्या.
आंदोलकांनी तहसीलदार आंदोलनस्थळी आल्यानंतरच आम्ही आंदोलन मागे घेऊ, अशी ठाम भूमिका घेतली. यावेळी पोलीस प्रशासनाने संतप्त ग्रामस्थांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने आंदोलन बराच वेळ चालले. अखेर निवासी नायब तहसीलदार राहुल मुळीक यांनी घटनास्थळी येऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी शाळेतील मुलांनी शाळा आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
यावेळी सरपंच सचिन दरेकर यांसह जिल्हा परिषद माजी अध्यक्ष थोरे, माजी सदस्य ज्ञानेश्वर पवार, निफाडचे माजी सभापती कैलास सोनवणे, राजाराम दरेकर, विलास गोरे, संजय शेवाळे, पांडुरंग राऊत, किशोर जेऊघाले, विजय दरेकर, सुनील दरेकर, ज्ञानेश्वर दरेकर, सोपान दरेकर, इस्माईल मोमीन, नीलेश चव्हाण, नीलेश सालकाडे, फिरोज मोमीन, प्रवीण सालगुडे, किशोर जेऊघाले, दत्तात्रय व्यवहारे, राजेंद्र मोरे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाने वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, याबाबत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी याची दखल घेऊन तात्काळ जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी शशिकांत मगरुळे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून नोंद न करता सातबारा उतारा बंद करण्याचे आदेश दिल्याचे यावेळी
सांगण्यात आले.
अॅम्ब्युलन्सला रस्ता मोकळा
आंदोलन सुमारे दोन तास चालू असल्याने यावेळी एक अॅम्ब्युलन्स येवल्याकडे जात होती. अॅम्ब्युलन्स गर्दीत अडकल्याने आंदोलनकर्त्यांनी त्या अॅम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करून देत येवल्याकडे मार्गस्थ केले.
शाळेची जागा गावठाण भागात असून, सिटी सर्व्हेला शाळेची नोंद आहे. सदर सातबारा हा त्याचवेळी रद्द झाला पाहिजे होता; परंतु तसे न झाल्याने ही बेकायदेशीर खरेदी झालेली आहे. ही केवळ शाळेची जमीन नसून, गावातील शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा हक्क आणि उज्ज्वल भविष्याशी निगडित असलेला संवेदनशील प्रश्न आहे. हा बेकायदेशीर सातबारा रद्द न झाल्यास यापेक्षाही मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल.
– सचिन दरेकर, सरपंच, विंचूर
Block road for Vinchur District School site