धरणांत बेपत्ता चार युवकांचे मृतदेह सापडले

वैतरणा धरण, दुगारवाडीतील दुर्घटना; दोघांचे प्राण वाचवण्यात यश

घोटी/इगतपुरी : प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यात वैतरणा धरण व दुगारवाडी परिसरात रविवारी (दि. 12) दुपारी चारच्या सुमारास दोन वेगवेगळ्या ठिकाणी बुडालेल्या बेपत्ता चार युवकांचे मृतदेह सोमवारी (दि. 13) सापडले. या घटनेत दोन जणांना सुखरूप वाचवण्यात घोटी पोलिसांना यश आलेे. विशेष म्हणजे, दोन्ही ठिकाणी दहा-दहा तरुण फिरण्यासाठी गेले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा धरणालगत असलेल्या झारवड परिसरात बेटावर दोन जण बुडाले, तर दुगारवाडी धबधब्याजवळ दोन मित्र पाण्यात उतरले होते. मात्र, पाण्याच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अचूक अंदाज न आल्याने एकजण वाहून जाऊ लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात दुसराही युवक पाण्यात गेला. या दुर्दैवी घटनेत दोघे युवक बुडाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने शोधकार्य सुरू केले होते. यातील मृत्यू झालेल्या युवकांची नावे आदित्य प्रमोद वानरे (वय 20, रा. नांदुरा, बुलढाणा) आणि विरेंद्र नंदन पाटील (रा. पाचोरा, जळगाव) अशी असल्याचे समजते.
दुसरी घटना दुगारवाडी धबधब्यावर घडली. येथेही दोन युवक पाण्यात बुडाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेतील मृत युवकांची नावे अथर्व सुनील गोसावी (वय 29, रा. गंगापूर, नाशिक) आणि मंगेश दिलीप चव्हाण (रा. चांदशी, नाशिक) अशी आहेत. वैतरणा धरण परिसरात धरणाच्या बेटावर गेलेल्या काही तरुणांना पाण्याची खोली अचानक वाढल्याचा अंदाज न आल्याने ते बुडाल्याची माहिती समोर आली. या घटनांची माहिती मिळताच घोटी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव व शोधमोहीम राबवली. स्थानिकांच्या मदतीने दोघांंना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. अंधार पडल्यामुळे शोधकार्य काही काळ थांबवण्यात आले. पुढील शोधासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाची मदत घेतली. सोमवारी दिवसभर चाललेल्या रेस्क्यूत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा देवरे, हवालदार बाळासाहेब आहेर, हवालदार सागर सौदागर, पोलीस शिपाई मारुती केंद्रे यांचा समावेश होता. झारवड परिसरात हवालदार सुनील पाटील, हवालदार देवकर, प्रकाश कासार, गुरुदेव मोरे, गौरव सोनवणे यांनी रेस्क्यू केले.

जीव धोक्यात घालून रेस्क्यू ऑपरेशन

दुगारवाडी धबधबा खोल व धोकादायक असल्यामुळे येथून मृतदेह बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागली. पाण्याचा वेग, खोल दरी आणि घसरडा परिसर यामुळे बचावकार्य कठीण झाले होते. तरीही रेस्क्यू टीमने धैर्य दाखवत स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने दोर्‍यांच्या सहाय्याने खाली उतरून मृतदेह बाहेर काढले. या मोहिमेत जीव धोक्यात घालून काम करण्यात आले. अखेर अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सर्व मृतदेह काढण्यात यश आले.

Bodies of four missing youths found in dam

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *