सिन्नर : प्रतिनिधी
खासगी सावकारांच्या सततच्या पैशांच्या तगाद्याला आणि मानसिक छळाला कंटाळून फटाके व्यावसायिक अतुल रामदास बोर्हाडे (34, रा. रामनगरी, सिन्नर) यांनी आत्महत्या केल्याप्रकरणी सिन्नर पोलिसांनी सात संशयितांना शनिवारी (दि. 14) सायंकाळी अटक केली होती. रविवारी (दि. 15) या सातही संशयितांना सिन्नर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या कारवाईमुळे शहरातील अवैध सावकारीचे प्रकरण ऐरणीवर आले आहे.
अतुल बोर्हाडे यांनी 11 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी त्यांच्या पत्नी प्रियांका बोर्हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिन्नर पोलिसांनी 14 नोव्हेंबर रोजी भारतीय न्यायसंहिता 2023 मधील कलम 108, 352, 351(2), 329(3) तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 मधील कलम 39 व 45 अन्वये गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी तपास पथक तयार करून संशयितांचा शोध घेत शनिवारी सायंकाळी सात जणांना अटक केली.
यामध्ये सचिन संभाजी गिते (45, रा. कानडी मळा), सौरभ मनोज खेडलेकर (33, रा. कुंभार गल्ली), सचिन बाबूराव धनगर (36, रा. वैदूवाडी), हर्षल मिलिंद गोळेसर (24, रा. खळवाडी), मीरा अनिल खोपे (62, रा. विजयनगर), माधुरी सागर शिंदे (28, रा. नायगाव रोड) आणि उज्ज्वला रवींद्र लोखंडे (55, रा. नाशिकवेस) यांचा समावेश आहे. रविवारी या सर्व संशयितांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
Borade suicide: Seven suspects remanded to two days’ police custody