विधान परिषद निवडणूक आचारसंहितेची अडचण
नाशिक : प्रतिनिधी
विधान परिषद निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आदर्श आचारसंहितेमुळे नाशिक महापालिकेची कोट्यवधीची कामे अडकणार आहेत. यातील सर्वाधिक मोठे व महत्त्वाचे असलेले द्वारका-नाशिकरोड रस्त्याचे कामही आचारसंहितेच्या कचाट्यात येणार असल्याने परिणामी 220 कोटींचे काम लांबणीवर पडणार आहे. या रस्त्यासंदर्भात मक्तेदारांची मंगळवारी (दि.19) बैठक बोलावण्यात आली असता, त्यांनी मागील काही दिवसांत डांबर, खडीसह इतर साहित्याच्या किमती वाढल्याने कामात स्टार रेट देण्याची
मागणी केली.
सर्वाधिक वाहतूक असलेल्या नाशिक-पुणे रोडवरील द्वारका-दत्तमंदिर या महामार्गाच्या कामालादेखील आचारसंहितेचा फटका बसणार आहे. या कामासाठी केंद्र शासनाने 220 कोटी रुपयांच्या निधीला अंतिम मान्यता दिल्याने या रस्तेकामाचा मार्ग मोकळा झाला. त्यादृष्टीने महापालिकेने निविदा प्रक्रिया राबविली असता, त्याच्या निविदापूर्व बैठकीत एकूण दहा मक्तेदारांनी सहभाग घेतला. या बैठकीत रस्त्याच्या कामामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा भाग हा भूसंपादनाचा असतो. त्यामुळे भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया महापालिकेने पूर्ण करून द्यावी तसेच बांधकाम साहित्य, डांबराच्या वाढत्या किमती पाहता मनपाने स्टार रेटनुसार दर देण्याची एकमुखी मागणी मक्तेदार कंपनीच्या प्रतिनिधींनी केली. यामुळे महापालिकेकडून स्टार रेट दिला जाणार का, याकडे लक्ष लागून आहे. दरम्यान, महिनाअखेर द्वारका-नाशिकरोड (दत्त मंदिर) या सुमारे साडेसहा किमीच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार होती. परंतु, आचारसंहितेमुळे हे काम लांबणीवर पडणार आहे. सिंहस्थाच्या अनुषंगाने महापालिकेने हाती घेतलेली काही कामे आचारसंहितेत अडकणार आहेत. सिंहस्थाच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आवश्यक मानल्या जाणार्या द्वारका रस्त्याचे काम लांबणीवर पडणार आहे.
Break on Dwarka’s Rs 220 crore road work?