मुखेड फाट्यावर बसेसची समोरासमोर धडक

नऊ प्रवासी जखमी; बसेसच्या दर्शनी भागाचे नुकसान

येवला : प्रतिनिधी
मनमाड-येवला राज्य महामार्गावर येवला तालुक्यातील मुखेड फाट्यावर गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास एसटी बस आणि हिरकणी बस यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात सात ते नऊ प्रवासी जखमी झाले. दरम्यान, दोन बसेसमध्ये झालेल्या अपघातात गाड्यांच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
येवला तालुक्यातील मुखेड फाटा येथे येवला-नाशिक राज्यमार्गावर येवल्याकडून येणारी बस आणि नाशिककडून येणारी बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. दोन्ही बसेस वेगात असताना समोरून येणार्‍या वाहनाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला.
या अपघातात जीवन बाबूराव माळी (वय 50), संतोष शिवाजी गायकवाड (46), आकांक्षा राजेश भालेराव (24), अनिता संतोष गायकवाड (34), बाबूराव शंकर धुमाळ (65), लीलाबाई बाबूराव धुमाळ (50), राहुल बापू जाणे (36) आदी प्रवासी जखमी झाले आहेत. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना येवला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. दोन्ही एसटी बसमधील प्रवाशांना जबर मार लागला आहे. प्रवाशांच्या हात, पाय, डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सदर जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. या अपघातानंतर येवला- नाशिक राज्य महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती.

Buses collide head-on at Mukheda junction

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *