बांधकामचे आरोग्य विभागाला पत्र
नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ पार्श्वभूमीवर विकासकामे सुरू आहेत. दरम्यान, साधुग्रामसह शहरातल्या काही भागांत विकासकामांना फटका बसत आहे. यात घाट आणि साधुग्रामकडे जाणार्या प्रमुख मार्गांचे विकासकाम सुरू असताना गोठ्यांमधून सोडल्या जाणार्या सांडपाण्यामुळे या कामांमध्ये अडथळे येत आहेत. याप्रकरणी नाशिक महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आरोग्य विभागाला तातडीने कारवाई करण्याचे पत्र पाठविले आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने आरोग्य विभागाला पत्र पाठवून संबंधित गोठ्यांमधून नाल्यात सोडले जाणारे पाणी तत्काळ बंद करण्यासह आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. आरोग्य विभाग आता संबंधित गोठेमालकांवर कोणती कारवाई करतो, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, प्रभाग 23 मधील गोठ्यांच्या सांडपाण्याचा प्रश्न भाजपच्या नगरसेविका संध्या कुलकर्णी यांनी यापूर्वी महासभेत उपस्थित केला होता. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर विषय असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली होती.
लेखानगर ते रविशंकर रोड तसेच विजय ममता चौक ते संगम पूल या दोन महत्त्वाच्या रस्त्यांचे काम सध्या सुरू आहे. हे दोन्ही मार्ग सिंहस्थ काळात घाट आणि साधुग्रामकडे जाणार्या वाहतुकीसाठी महत्त्वाचे आहेत. मात्र, या रस्त्यालगत असलेल्या पावसाळी नाल्यांमध्ये गोठ्यांमधील सांडपाणी मोठ्या प्रमाणात सोडले जात असल्याचे बांधकाम विभागाच्या निदर्शनास आले आहे. गोठ्यातील सांडपाण्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर घाण आणि दुर्गंधी पसरत असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या जागेत सतत पाणी साचत असल्याने कामाचा वेग मंदावला आहे. ठेकेदारांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, सिंहस्थासाठी कोट्यवधी रुपयांची विकासकामे सुरू असताना प्रशासनातील विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे या प्रकारातून समोर आले आहे. एका बाजूला रस्ते विकसित केले जात आहेत, तर दुसर्या बाजूला अनधिकृतपणे नाल्यात सोडल्या जाणार्या सांडपाण्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा आहे.
Cattle shed wastewater is hampering Simhastha-related works.