अधिक मास संपण्यास पाच दिवस उरल्याने लगबग
नाशिक : प्रतिनिधी
सोन्याच्या दराने जानेवारीत एक लाख 84 हजार 500 रुपयांचा उच्चांकी दर गाठला होता. सोन्यासह चांदीनेही चार लाखांचा टप्पा ओलांडला होता; परंतु जेव्हा भाव वाढतात तसे ते कमीही होतात. 15 ते 25 टक्के करेक्शन होते. त्यामुळे जागतिक बाजारातील ऐतिहासिक तेजीनंतर महागाई, युद्धजन्य परिस्थिती आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे वाढलेले सोने आता नफावसुली, मजबूत अमेरिकी डॉलर आणि उच्च व्याजदराच्या शक्यतेमुळे दर खाली आले आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्याचे भाव तीस हजारांनी उतरले आहेत.
गेल्या आठवड्यात सोने-चांदी दरात घसरण झाली आहे. सोने-चांदी दरात तीन ते पाच हजारांची घट झाली आहे. जानेवारीत सोन्याचा सर्वोच्च दर एक लाख 85 हजार रुपये होता. जवळपास 30 हजारांनी सोन्याचा दर खाली आला आहे. सध्या सोने (प्रति दहा गॅम) एक लाख 54 हजार 500 रुपये आहे. त्याचप्रमाणे चांदीचा सर्वोच्च दर चार लाख 25 रुपये होता. आता दोन लाख 50 हजारांवर चांदीचा दर आला आहे.
आंंतरराष्ट्रीय घडामोडी, युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी दरात मोठे चढउतार होत आहेत. सोने दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. परिणामी हलक्या वजनाच्या दागिन्यांना मागणी वाढली आहे. अधिक मास संपायला अवघे पाच दिवस उरले आहेत. अधिक मासानिमित्त लेक-जावयाला भेट देण्यासाठी सोने-चांदीच्या वस्तूंसह इतर भेटवस्तू देण्यात येते. सोने-चांदीच्या दरातील घसरण झाल्याने अधिक मासाची गोडी वाढल्याचे चित्र आहे.
17 मे पासून अधिक मासाला सुरुवात झाली. अधिक मास संपायला अवघे पाच दिवस उरले आहेत. अधिक मासात लेक-जावयाला आमंत्रण देत सोने-चांदी किंवा तांबे, पितळेच्या भेटवस्तू देण्यात येतात. गेल्या आठवड्यात सोने-चांदी दरात घसरण झाली आहे. चिंतेत असलेल्या आई-वडिलांना लेक-जावयासाठी सोने-चांदी खरेदी करण्यासाठी दिलासा मिळाला आहे. झपाट्याने वाढणार्या सोने-चांदी दराने सामान्यांचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली होती. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोनेखरेदी टाळावी, असे आवाहन केले होते. परिणामी सोने-चांदीचे दर कोसळतील असा अंदाज व्यक्त होत असताना, उलट सोन्याच्या दराने नवा उच्चांक गाठला होता.
असे आहेत दर
सोने प्रति दहा गॅम – 24 कॅरेट : एक लाख 54 हजार रुपये.
– 22 कॅरेट : एक लाख 42 हजार रुपये.
चांदी प्रतिकिलो – : दोन लाख 50 हजार रुपये. जीएसटीसह
30 जानेवारी 2026 रोजी जीएसटीसहित एक लाख 84 हजार 500 रुपये प्रतितोळा या उच्चांकी स्तरावर असलेले सोने आज जवळपास एक लाख 54 हजार 500 प्रतितोळा झाले आहे. म्हणजेच ग्राहकांना सुमारे 30 हजार प्रतितोळा कमी दराने खरेदीची संधी मिळते. इतिहास सांगतो की, सोन्यात वेळोवेळी असे 15 ते 25 टक्के करेक्शन येते. मात्र, दीर्घकालीन काळात महागाईपासून संरक्षण आणि संपत्ती टिकवण्याचे काम सोने करत आले आहे. जागतिक मध्यवर्ती बँकांची खरेदी, वाढती सरकारी कर्जे आणि भूराजकीय तणाव यामुळे सोन्याचा दीर्घकालीन पाया अजूनही मजबूत आहे. मोठ्या तेजीनंतरची घसरण ही घाबरण्याची वेळ नसून, योग्य नियोजनाने सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी असते.
– चेतन राजापूरकर, अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र आयबीजेए
Gold prices have dropped by ₹30,000 in six months.