मध्यरात्री श्रीकृष्णजन्माचा जल्लोेष

इस्कॉन मंदिरात भाविकांची गर्दी

नाशिक : प्रतिनिधी
द्वारका परिसरातील हरे कृष्ण मार्ग येथील इस्कॉनच्या श्री श्री राधा मदन गोपाल मंदिरात गुरुवारी (दि. 4) श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत अत्यंत भक्तिमय वातावरणात झाला. पहाटे पाच वाजता मंगल आरतीने उत्सवाला सुरुवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप आणि श्रीमद्भागवत प्रवचन झाले.
इस्कॉनचे आंतरराष्ट्रीय प्रचारक श्रीमान चैतन्य चरण प्रभू यांनी प्रवचनातून भगवान श्रीकृष्णांचा जन्म आणि लीला भौतिक नसून पूर्णपणे दिव्य असल्याचे सांगितले. नामजप, निष्काम सेवा, नम्रता व शरणागतीच्या माध्यमातून श्रीकृष्णाच्या चरणी चित्त स्थिर ठेवणे, हेच मानवी जन्माचे सार्थक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दिवसभर सलग 14 तास अखंड भावमधुर कीर्तनाने मंदिर परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. सुवासिक फुले आणि आकर्षक विद्युत रोषणाईने सजवलेल्या मुख्य वेदीवर श्री श्री राधा मदन गोपालजींचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
रात्री अकरा वाजता श्री राधा-कृष्णाच्या उत्सव विग्रहांचा पंचामृत व विविध फळांच्या रसांनी भव्य अभिषेक करण्यात आला. विविध नैवेद्य अर्पण केल्यानंतर मध्यरात्री बारा वाजता कृष्णजन्म मुहूर्तावर मुख्य महाआरती झाली. इस्कॉन यूथ सर्व्हिसच्या ‘चेतना’ व ‘प्रेरणा’ उपक्रमांचे तसेच धार्मिक ग्रंथ वितरणाचे स्टॉल्सही भाविकांचे आकर्षण ठरले.
दरम्यान, शनिवारी (दि. 5) पारंपरिक नंदोत्सव आणि इस्कॉनचे संस्थापकाचार्य श्रील प्रभुपाद यांचा आविर्भाव महोत्सव साजरा होणार आहे. सकाळी 11 ते 1 या वेळेत नंदोत्सवासह सर्व भाविकांसाठी विशेष महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कथाकार श्रीमान चैतन्य चरण दास यांच्या पाच दिवसीय विशेष कृष्णकथेचे तीन दिवस पूर्ण झाले आहे. 5 व 6 सप्टेंबर रोजी उर्वरित कथा होणार आहे. 10 ते 12 सप्टेंबरदरम्यान सायंकाळी 7.30 ते 9.30 या वेळेत विशेष तीन दिवसीय गीता कोर्स आयोजित करण्यात येणार आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन इस्कॉन नाशिक मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे.

Celebrations of Shri Krishna’s birth at midnight.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *