कुंभमेळ्यापूर्वी रस्त्यांचे जाळे होणार मजबूत

रस्ते विकासासाठी 17 हजार कोटींचा निधी

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रस्ते आणि वाहतूक व्यवस्थेच्या सुधारणेला मोठे प्राधान्य देण्यात आले आहे. सिंहस्थासाठी प्रस्तावित 34 हजार 732.42 कोटी रुपयांच्या एकूण आराखड्यात 51 टक्के निधी रस्ते विकासासाठी राखण्यात आला आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरातील प्रमुख रस्ते, राष्ट्रीय महामार्ग आणि महत्त्वाच्या वाहतूक मार्गांच्या सुधारणेला वेग येणार आहे.
कुंभमेळ्याच्या काळात देशभरातून लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होणार असल्याने वाहतूक कोंडी टाळणे आणि प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंतचा प्रवास सुलभ करणे, हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान आहे. त्यासाठी शहरातील रस्त्यांची क्षमता वाढविण्यासोबतच बाह्य मार्गांची जोडणी मजबूत करण्यावर भर देण्यात आला आहे. राज्य शासनाच्या कुंभनिधीतून 22 हजार 425.39 कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते प्रकल्पांसाठी दोन हजार 270.60 कोटी प्रस्तावित आहेत. केंद्र शासनाच्या विविध प्रकल्पांसाठी 8 हजार 761.54 कोटींंची तरतूद करण्यात आली असून, त्यात महामार्गांच्या कामांचा मोठा वाटा आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) नऊ कामांसाठी दोन हजार 763.24 कोटी रुपये प्रस्तावित असून, या कामांची लांबी 625.74 किलोमीटर आहे. राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सुरू असलेल्या सात कामांसाठी 4 हजार 355.92 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या कामांची एकूण लांबी 294.66 किलोमीटर आहे. शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या द्वारका चौक सुधारणेसाठी 214 कोटी, तर रामकाल पथासाठी 99.14 कोटी प्रस्तावित आहेत. या कामांमुळे शहरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
रस्त्यांनंतर साधुग्राम व तात्पुरत्या पायाभूत सुविधांसाठी 17 टक्के, इमारतींसाठी 9 टक्के, पूल व उड्डाणपुलांसाठी 8 टक्के आणि पार्किंग, वाहतूक व गर्दी व्यवस्थापनासाठी 6 टक्के निधी प्रस्तावित आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने होणारी रस्त्यांची कामे कुंभमेळ्यानंतरही नाशिकच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाची ठरणार आहेत.

रस्ते विकासाचा मोठा आवाका
रस्ते विकासासाठी : 51 टक्के
एनएचएआयची कामे : 09
एनएचएआय निधी : 2,763.24 कोटी
राष्ट्रीय महामार्ग-पीडब्ल्यूडी : 4,355.92 कोटी
द्वारका चौक : 214 कोटी
रामकाल पथ : 99.14 कोटी

सिंहस्थानंतरही मिळणार फायदा
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रस्तावित रस्ते प्रकल्पांचा उद्देश केवळ कुंभमेळ्यातील वाहतूक सुरळीत करणे नसून नाशिकची दीर्घकालीन वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, हा आहे. प्रमुख रस्त्यांची क्षमता, शहरातील जोडणी आणि बाह्य मार्गांचा विकास झाल्यास स्थानिक नागरिकांनाही त्याचा दीर्घकालीन लाभ मिळणार आहे.

Road network to be strengthened before Kumbh Mela.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *