साखरेची दरवाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारचे कठोर पाऊल

नवी दिल्ली :
साखरेच्या दरात मोठी वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाढत्या साखरेच्या दरामुळे ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. दरम्यान, साखरेच्या दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे. सरकारने दहा लाख टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर आणखी एका महत्त्वाच्या नियमामध्ये सरकारने बदल केला आहे. साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. दोन महिन्यांच्या आत साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करणे अनिवार्य केले आहे. यामुळे वाढणार्‍या दरात काही प्रमाणात शिथिलता येऊ शकते.

सणासुदीच्या दिवसांपूर्वी साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने कठोर पाऊल उचलले असून, कच्च्या साखरेच्या आयातीशी संबंधित नियमांमध्ये सुधारणा केली आहे. दोन महिन्यांच्या आत साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करणे अनिवार्य केले आहे.
साखरेच्या वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर, सरकारने सोमवारी आयातीच्या अटींमध्ये सुधारणा केली आहे. यानुसार टॅरिफ रेट्स कोट्याअंतर्गत आयात केलेल्या कच्च्या साखरेचे दोन महिन्यांच्या आत पांढर्‍या/शुद्ध साखरेत रूपांतर करून देशांतर्गत बाजारात विक्री करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पूर्वीच्या नियमांनुसार, आयात केलेल्या कच्च्या साखरेवर वाजवी कालावधीत आणि वेळेच्या खूप आधी प्रक्रिया करणे आवश्यक होते, जेणेकरून ती 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत देशांतर्गत बाजारात विकली जाऊ शकेल. सुधारित नियमांनुसार आता प्रक्रिया आणि विक्रीसाठी दोन महिन्यांची मुदत अनिवार्य करण्यात आली आहे. कच्च्या साखरेची साठेबाजी रोखणे आणि ग्राहकांना आयातीपासून लवकरात लवकर दिलासा देणे, हा यामागील उद्देश आहे. सरकारच्या या निर्णयामुळे साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्याची आशा निर्माण झाली आहे.
सरकारने 31 ऑक्टोबरपर्यंत दहा लाख टन साखरेच्या आयातीला परवानगी दिली असून, शीतपेय व आइस्क्रीम उत्पादक, संबंधित व्यापारी आणि घाऊक ग्राहकांवर साठा मर्यादा निश्चित केली आहे. देशभरातील अनेक राज्यांनी केंद्र सरकारला साखरेची साठेबाजी आणि काळाबाजार याविरोधात कारवाई करण्याची विनंती केली आहे.

एक महिन्यात साखर किती महाग…

सरकारी आकडेवारीनुसार, सोमवारी अखिल भारतीय सरासरी किरकोळ दर प्रतिकिलाो 63.05 रुपये होता, जो महिनाभरापूर्वीच्या प्रतिकिलो 48.73 रुपयांपेक्षा 29 टक्क्यांनी जास्त आहे. कमाल किरकोळ दर प्रतिकिलो 75 रुपये होता. अन्न सचिव संजीव चोप्रा म्हणाले की, कारखान्यातून येणार्‍या साखरेचा भाव केवळ सात ते दहा दिवसांत प्रतिकिलो 47 ते 48 रुपयांवरून 62 रुपयांपर्यंत वाढला आहे, ही एक धक्कादायक वाढ आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *