कॉम्पॅक्ट अथवा तत्सम मेट्रो शहरात धावणार
नाशिक : प्रतिनिधी
मेट्रो निओचा प्रस्ताव गुंडाळल्यानंतर कॉम्पॅक्ट मेट्रो किंवा तत्सम मेट्रोसाठी महामेट्रोने चाचपणी सुरू केली आहे. त्याद़ृष्टीने नाशिक शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश नाशिक महापालिकेला देण्यात आले आहेत. हा आराखडा महामेट्रोला सादर केला जाणार आहे. दरम्यान, लवकरच महामेट्रोचे पथक शहरात येऊन सर्वेक्षण करणार आहे. शिवाय नागरिकांचे अभिप्रायही नोंदवले जाणार आहेत. नाशिकमध्ये मेट्रो येणार याबाबत वारंवार आश्वासन दिले जात असून, प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही होत नसल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. मात्र, महामेट्रोकडून नाशिकच्या लोकसंख्येच्या द़ृष्टीने मेट्रो दिली जाणार आहे..
वाढत्या नागरीकरणाबरोबर शहरातील वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पार्किंग, ध्वनि-वायुप्रदूषणाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने सर्व महापालिकांना स्वतंत्रपणे वाहतूक आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नाशिक महापालिकेने यापूर्वी 2016 मध्ये वाहतूक आराखडा तयार केला होता. त्यावेळी 2036 च्या लोकसंख्येचा विचार करून आराखड्याचे नियोजन करण्यात आले होते. सार्वजनिक परिवहन व्यवस्था सक्षमीकरणावर भर देण्याबरोबरच सार्वजनिक वाहतूक धोरण, पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, रस्ता विकास, मालवाहतूक, तंत्रज्ञान व रहदारी अभियांत्रिकी धोरणाचा समावेश होता. अर्बन मास ट्रान्झिट (यूएमटीसी) या दिल्लीस्थित कंपनीने सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला होता. शहरात सिटीलिंकची बससेवा या आराखड्यातीलच शिफारस होती.