मोहाडीत मोहाडमल्ल महाराजांची शतकाची रोठ परंपरा

लोकसहभागातून साडेतीन लाखांचा रथ; आज भव्य मिरवणूक

दिंडोरी : प्रतिनिधी
तालुक्यातील मोहाडी येथील ग्रामदैवत श्री मोहाडमल्ल महाराज यांचा शेकडो वर्षांची परंपरा असलेला प्रसिद्ध रोठ उत्सव दरवर्षीप्रमाणे आषाढ महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी उत्साहात साजरा केला जाणार आहे. या वर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे ग्रामस्थांच्या देणगीतून साकारलेला तब्बल साडेतीन लाख रुपयांचा भव्य रथ असणार आहे.
उत्सवाची सुरुवात भल्या पहाटे नाशिक येथून होते. गावातील तरुण भाविक नाशिकच्या पवित्र रामकुंडावर स्नान करून पादत्राणे न घालता श्री मोहाडमल्ल महाराजांचा जयघोष करत पायी मोहाडीकडे गंगाजल आणतात. या गंगाजलाने दुपारी ब्राह्मणवृंदांच्या मंत्रोच्चारात महाराजांचा अभिषेक व महापूजा होते. सकाळी सजवलेल्या बैलगाडीतून पिपाणी व संबळ या पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत संपूर्ण गावात महाराजांची मिरवणूक काढली जाते. ग्रामस्थ व महिला भगिनी ठिकठिकाणी पूजन करून रोख रक्कम, धान्य, गावरान तूप व गुळाचे दान देतात. एकत्रित झालेल्या धान्याचे पीठ करून गावातील महिला भगिनी एकत्र येत चपात्या बनवतात. त्यानंतर चपात्या, गावरान तूप आणि गूळ यांचा मलिदा तयार करून महाराजांना नैवेद्य दाखवला जातो. सायंकाळी सर्व भाविकांना गूळ-काल्याच्या व मलिद्याच्या प्रसादाचे वाटप केले जाते. पूर्वापार परंपरेनुसार या संपूर्ण कार्यक्रमाच्या नियोजन व आयोजनाची धुरा स्थानिक धनगर बांधव व सकल ग्रामस्थ एकत्र येऊन मोठ्या आनंदाने सांभाळतात. सायंकाळी तब्बल सव्वा क्विंटल पिठाच्या मलिद्याचा महाप्रसाद आयोजित केला आहे. या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व मोहाडी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Centuries-old ‘Roth’ tradition of Mohadamall Maharaj in Mohadi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *