देशवासीयांनी जीएसटी बचत उत्सव साजरा करावा : पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : केंद्र सरकारने अनेक वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेतल्याने देशातील लोकांना मोठा फायदा होणार आहे. वेगवेगळ्या कराच्या जाळ्यातून देशातील नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. जीएसटी कमी केल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. आता फक्त 5 व 18 टक्के असे दोनच स्लॅब राहणार असल्याने देशवासीयांनी आजपासून बचत महोत्सव साजरा करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. काल नवरात्रीच्या पूर्वसंध्येला मोदींंनी देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नव्या जीएसटी प्रणालीची माहिती दिली. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सूर्योदयासोबतच नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म लागू होणार आहे. एकप्रकारे देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होईल. यात बचत वाढून आवडीच्या वस्तू सोप्या पद्धतीने खरेदी करू शकाल, असे मोदी म्हणाले.
आपल्या देशातील गरीब, मध्यमवर्गीय लोक, तरुणाई, शेतकरी, महिला, व्यापारी सर्वांना या बचत उत्सवाचा मोठा फायदा होणार आहे.
सणांच्या काळात सगळ्यांचे तोंड गोड होणार आहे. देशातल्या प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढणार आहे. मी देशातल्या सर्व कुटुंबांना नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्मच्या खूप खूप शुभेच्छा देतो. हे रिफॉर्म भारताच्या विकासाला गती देणार आहेत. व्यापार आणखी सोपे होतील. प्रत्येक राज्याला विकासाच्या शर्यतीत बरोबरीत स्थान मिळणार आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
“2014 मध्ये जेव्हा तुम्ही आम्हाला सेवा देण्याची संधी दिली, तेव्हा आम्ही सार्वजनिक हितासाठी आणि राष्ट्रीय हितासाठी जीएसटीला आमचे प्राधान्य दिले. आम्ही प्रत्येक भागधारकाशी चर्चा केली, प्रत्येक राज्याच्या चिंता दूर केल्या आणि प्रत्येक प्रश्नाचे निराकरण केले. स्वतंत्र भारतातील प्रमुख कर सुधारणा सर्व राज्यांना सहभागी करून घेणे शक्य झाले. केंद्र आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांचेच हे फळ होते की देश आता डझनभर करांपासून मुक्त झाला आहे. एक राष्ट्र, एक करचे स्वप्न साकार झाले आहे,“ असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. 99 टक्के वस्तूंवर आता फक्त 5 टक्के कर राहील. जीएसटी कपातीमुळे आता नागरिकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. बहुतेक दैनंदिन वस्तू अधिक परवडणाऱ्या झाल्या आहेत.
99 टक्के वस्तूंवर 5 टक्के कर
आता 99 टक्के वस्तूंवर फक्त पाच टक्के कर आकारला जाईल. यामुळे मध्यमवर्गीयांचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा होत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. जीएसटी दर कमी केल्याने त्यांची स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. सुधारणा ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे. काळ आणि गरजा बदलतात. म्हणूनच देशाच्या सध्याच्या आणि भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी नेक्स्ट जनरेशन जीएसटी सुधारणा लागू केल्या जात आहेत. हे बदल सर्वांना दिलासा आणि संधी देतील, असे आश्वासन पंतप्रधान मोदींनी दिले.
या निर्णयामुळे गरीब, नव-मध्यमवर्गीय आणि मध्यमवर्गीयांना दुहेरी फायदा होत आहे. जीएसटीमध्ये कपात केल्याने नागरिकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल.
देशभरात आजपासून जीएसटी 2.0ची अंमलबजावणी होत आहे. केंद्र सरकारच्या या नव्या कररचनेमुळे अनेक वस्तूंवरील जीएसटी कमी होणार असून, ग्राहकांना थेट फायदा होणार आहे. कार, दुचाकी, जीवनावश्यक वस्तू, घरबांधणीसाठी लागणारे साहित्य यांपैकी काहींच्या किमतींमध्ये मोठी घट होईल, अशी अपेक्षा आहे. सध्या ग्राहकांच्या दृष्टीने सर्वांत मोठा बदल म्हणजे अन्नपदार्थांच्या दरात घट होणार आहे. यात पनीर, भाकरी, पराठा यांवरील कर शून्यावर आला आहे. तूप, लोणी, नूडल्स, पास्ता, टॉफी, कँडी आणि फ्लेवर नसलेले पॅक मिनरल वॉटर यांवरील करात 7 ते 13 टक्क्यांपर्यंत कपात झाली आहे. त्यामुळे हॉटेल, रेस्टॉरंट आणि किराणा बाजारात दर कमी होण्याची शक्यता आहे. तंबाखू, दारू आणि लक्झरी वस्तूंवरील कर-दर मात्र वाढवण्यात आला आहे. त्यावरून सरकारने
सामान्य ग्राहकांना दिलासा दिला असला, तरी श्रीमंत वर्गावर अतिरिक्त भार टाकला असल्याची चर्चा आहे.
ग्राहकांना थेट फायदा
कर-दर घटल्यामुळे वस्तू स्वस्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, हा फायदा प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत कंपन्या पोहोचवतील का, हा मोठा प्रश्न आहे. गतकाळातील अनुभव लक्षात घेता अनेक कंपन्यांनी करदर कमी झाल्यानंतरही किमती कमी केल्या नाहीत. त्यामुळे केंद्र सरकारने या वेळेस थेट किंमत घट तपासण्यासाठी यंत्रणा सक्रिय केली आहे. राज्यांच्या कर आयुक्तांनाही कडक निरीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. महागाईचा फटका बसलेल्या ग्राहकांसाठी जीएसटी 2.0 काहीसा दिलासा देणारा ठरू शकतो. अन्नधान्य, दूध-तुपासारख्या वस्तू स्वस्त झाल्यामुळे घरगुती खर्च कमी होईल. त्याचबरोबर वाहन खरेदी आणि घरबांधणीचा खर्च कमी झाल्यास बाजारात खरेदीवाढ होऊन आर्थिक चक्र गतिमान होण्यास चिन्हे आहेत. दुसरीकडे, विरोधकांनी सरकारवर टीका सुरू केली आहे. जीएसटी कपात केवळ निवडणूकपूर्व डाव आहे, असा आरोप केला जात आहे.
फडणवीसांनी मानले आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी देशाला संबोधित करत उद्यापासून लागू होणाऱ्या जीएसटी रिफॉर्मची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना हे ऐतिहासिक पाऊल असल्याचे म्हटले. आत्मनिर्भर भारताकडे जो आपला प्रवास आहे तो या जीएसटी रिफॉर्मच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांनी सुरू केला आहे. त्यामुळे भारतीयांच्या वतीने पंतप्रधान मोदींचे आभार मानतो. इतक्या मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक असे जीएसटीचे रिडक्शन हे पंतप्रधान मोदी यांनी केले आहे,“ असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.