मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशकात

‘कुंभ भक्ती संगम’चे करणार उद्घाटन

नाशिक : प्रतिनिधी
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पाश्वर्र्भूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘सिंहस्थ महाकुंभ भक्ती संगम’ या तीन दिवसीय महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुक्रवारी (दि. 28) होणार आहे. ठक्कर डोम येथे दुपारी उद्घाटन सोहळा पार पडणार असून, या कार्यक्रमाला राज्यातील प्रमुख मंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
प्रमुख मान्यवर म्हणून अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत, पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह आ. सुहास कांदे व नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके उपस्थित राहणार आहेत. 28 ते 30 ऑगस्टदरम्यान ठक्कर डोम येथे हा भक्ती, संगीत आणि अध्यात्माचा महोत्सव रंगणार आहे. उद्घाटनानंतर प. पू. अमृताश्रम स्वामी महाराज यांचे कीर्तन व रात्री प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांची अभंगवारी होणार आहे.
महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी भक्ती संमेलन, डॉ. चारुदत्त आफळे यांचे कीर्तन आणि मैथिली ठाकूर यांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. तर 30 ऑगस्ट रोजी भाई मनिंदर सिंहजी यांचे गुरबाणी शबद कीर्तन, मणिपूरचे नट संकीर्तन व निवृत्ती महाराज इंदूरकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.

Chief Minister Devendra Fadnavis in Nashik today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *