बालविवाह रोखण्यात पोलीसांना यश

रोखले २ बालविवाह त्र्यंबकचे बालविकास प्रकल्पाधिकारी , ग्रामसेवक , अंगणवाडीसेविका आणि पोलीस यांची एकत्रित कारवाई

त्र्यंबकेश्वर : वार्ताहर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभाग आणि युनिसेफ यांची एकत्रित बैठक रावसाहेब थोरात सभागृहात घेण्यात आली होती . या बैठकीदरम्यान मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बालविवाह रोखण्यासाठी यंत्रणेतील सर्व घटकांनी पुढाकार घ्यावा , असे निर्देश दिले होते . त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बालविकास प्रकल्पाधिकारी भारती गेजगे यांना रात्री ११ वाजता वावीहर्ष या गावात एका १७ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती . त्याचबरोबर टाकेहर्ष येथे एका १६ वर्षीय मुलीचा बालविवाह होणार , अशी माहिती मिळाली . हे दोन्ही बालविवाह रोखण्यासाठी संबंधित दोन्ही गावांतील ग्रामसेवक , अंगणवाडीसेविका , पोलीस प्रशासन यांना संपर्क करून घटनास्थळी भेट देत कारवाई करण्यास सांगितले .  , वावीहर्ष येथील ग्रामसेवक किसन राठोड , अंगणवाडी सेविका संगीता किर्वे यांनी गावातील बालविवाह होणाऱ्या कुटुंबात जाऊन संबंधित मुलगी व तिचे पालक यांची समजूत काढली . त्याचबरोबर टाकेहर्ष या गावातील ग्रामसेवक विजय आहिरे यांनी गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी जाऊन समुपदेशन केले आणि विवाह थांबवला . काल रोजी झालेल्या बैठकीत बालविवाह रोखण्यासाठी सूचना करण्यात आल्यानंतर लगेचच त्र्यंबकेश्वरमध्ये संबंधित गावातील ग्रामसेवक व अंगणवाडीसेविका यांनी कारवाई केल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *