मनमाड : प्रतिनिधी
सध्या जवळपास सर्वच रेल्वेगाड्या धावू लागल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये फुकट्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे . रेल्वे स्थानक आणि रेल्वे गाड्यांमधील विरोधात रेल्वे प्रशासनाने मोहीम सुरू केली . मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील प्रमुख रेल्वे स्थानकांमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध रेल्वे प्रशासनाने सुरू केलेल्या विशेष मोहिमेत १ एप्रिल ते १५ मे या कालावधीत रेल्वेच्या तिकीट तपासणी पथकाने १ लाख ५० हजार २५१ केसेसद्वारे १२ कोटी ४६ लाख ८३ हजार ४३४ रुपये इतकी दंडात्मक वसुली केली . मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी या ४५ दिवसांत रेल्वे प्रशासनाने जवळपास दुप्पट रक्कम वसूल केली आहे . सर्व प्रवाशांनी योग्य रेल्वे तिकिटासह प्रवास करावा , असे आवाहनही रेल्वे प्रशासनाने केले आहे . मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात वाणिज्य विभागाकडून रेल्वेच्या विनातिकीट प्रवास करणे , अनियमिततिकीट यात्रा व तिकिटाचा गैरवापर रोखण्यासाठी १ एप्रिलपासून विशेष तिकीट तपासणी मोहीम हाती घेण्यात आली . भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ . शिवराज मानसपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य व्यवस्थापक बी . अरुणकुमार , सहाय्यक प्रबंधक अनिल पाठक , विशेष तिकीट तपासणी पथकाचे निरीक्षक वाय . डी . पाठक यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिल ते १५ मे २०२२ या कालावधीत तिकीट तपासणी पथकाने भुसावळ विभागात व्यापक मोहीम राबवून वरीलप्रमाणे कोट्यवधी रुपयांची दंडात्मक कारवाई करून फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल केला . मागील वर्षी १ एप्रिल २०२१ ते १५ मे २०२१ या कालावधीत ७७ हजार ९ २३ फुकट्या प्रवाशांकडून ६ कोटी ३० लाख ७६ हजार ९ ८८ रुपयांची रक्कम वसूल केली होती . मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी या ४५ दिवसांत तिकीट तपासणी पथकाने जवळपास दुप्पट रक्कम वसूल केली , अशी माहिती रेल्वे प्रशासनाने पत्रकाद्वारे दिली .