पंचवटी : वार्ताहर
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या आदेशाने स्थापन झालेल्या दरोडा व शस्त्र विरोधी पथकामुळे ‘पोलिसिंग’ वरील ताण हलका होत आहे. या पथकाने पंचवटीतील गणेशवाडी उद्यान येथे सापळा रचून दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चार कोयते व एक चॉपर हस्तगत केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडा व शस्त्र विरोधी पथकाचे अधिकारी व कर्मचारी आज (दि.८) शहरात गस्त घालत असताना सहायक निरीक्षक किरण रोंदळे यांना पंचवटीतील गणेशवाडी उद्यान येथे दोघेजण धारदार शस्त्रे घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी याबाबत वरिष्ठांना कल्पना देताच तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले.
दरोडा व शस्त्र विरोधी पथकाने गणेशवाडी उद्यान येथे सापळा रचला असता दोघेजण संशयास्पदरित्या जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अंकुश मोतीराम जाधव (वय २०) श्रीकांत सुरेश मुकणे (वय १९ वर्षे) आशी आरोपींची नावे असून त्यांच्या ताब्यातून चार लोखंडी कोयते व एक चॉपर हस्तगत करण्यात आले. दोघेही पंचवटीतील शेरेमळा झोपडपट्टी येथे वास्तव्यास आहे. पोलिस आयुक्तांनी शस्त्र बाळगण्यास मनाई आदेश जारी केलेले असतांना या आदेशाचे उल्लघंन केल्याने त्यांच्या विरुध्द पंचवटी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक किरण रोंदळे सहायक उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे, हवालदार विजयकुमार सुर्यवंशी, भाऊसाहेब क्षिरसागर, शेख कादीर तसेच श्रीशैल सवळी, कडूबा पाटील, संदीप डावरे, प्रफुल्ल गांगुर्डे, प्रविण चव्हाण, विशाल जोशी, महेश खांडबहाले, मनिषा मल्लाह यांनी ही कामगिरी पार पाडली आहे.