नाशिक : आय. टी. सी. कंपनीची फ्रेंचायजी देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी एका इसमास सव्वासात लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याची घटना घडली.सायबर पोलिसांत फिर्यादी अविनाश नारायण पवार (रा. ऋषीराज हेबीटॅट, गंगापूर रोड, नाशिक) यांनी ऑनलाईन फसवणूक झाल्याची फिर्याद दिली.
पवार यांना दि. ९ ऑगस्ट रोजी संशयित प्रदीपकुमार, राकेश त्रिपाठी व चार्ल्स अँटोनी अशा विविध नावांनी संपर्क साधण्यात आला. या अज्ञातानी पवार यांना नाशिक शहरासाठी आयटीसी कंपनीची फ्रेंचायजी देण्याचे आमिष दाखविले, तसेच ९७४८३०२८८० या कंपनीच्या व्हॉट्सअॅप क्रमांक व मेल आयडी यावरून वारंवार संपर्क केरत. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर या भामट्यांनी पवार यांच्याशी संपर्क साधला व फ्रेंचायजीसाठी सिक्युरिटी डिपॉझिट प्रॉडक्ट्स बुकिंग रक्कम व जीएसटीव त्यांनी पंजाब नॅशनल बँकेचे खाते क्रमांक पवार यांना देण्यात आले. त्यानंतर पवार यांना या दोन्ही बँक खात्यांवर एकूण ७ लाख २९ हजार रुपयांची रक्कम भरण्यास भाग पाडून त्यांची आर्थिक फसवणूक केली, तसेच रिझर्व्ह बँकेच्या दि. १२ ऑक्टोबर २०१२ रोजी एनईएफटी व्यवहारात आयएफएससी कोड वापराबाबतच्या सर्क्युलरमधील नियमानुसार ग्राहकाने एनईएफटी व्यवहार करताना स्लीपवर बँच व आयएफएससी कोड चुकीचा नमूद केला असल्यास हा व्यवहार पुढे न करता ग्राहकांना त्याची माहिती करून देणे बंधनकारक होते; मात्र संबंधितांनी याबाबत कोणतीही माहिती न देता ऑनलाईन व्यवहार करून फसवणूक करणाऱ्या इसमांना मदत केली. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडिया, गोविंदनगर शाखा, नाशिक, तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या सारणी (कोलकाता) यांच्याविरुद्ध कायदेशीर तक्रार दिली असून, त्यानुसार संशयित इसमांसह दोन्ही बँकांविरुद्ध पवार यांनी सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली आहे गुन्हा दाखल करण्यात . पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली करीत आहेत.