सिटीलिंक बसला तोट्यात नेणारे ‘ ते ‘ मार्ग होणार बंद

 

नाशिक : प्रतिनिधी

कोरोना काळात सुरू केलेली सिटीलिक (citylink) बस सध्या तोट्यात सुरू आहे. काही मार्गांवर या बसला तुफान प्रतिसाद मिळतोय . तर काही मार्गावर प्रवासीच नसल्याने त्या ठिकाणी मोठा तोटा सहन करावा लागतोय . दरम्यान , शहरातील किती मागांवर सिटीलिंक शहर बसला तोटा होतो आहे हे शोधण्याचे काम सुरू असून , अशा मार्गावरील शहर बस लवकरच कायमची बंद करण्यात येणार असल्याची शक्यता आहे . नाशिक शहरात २०० च्या जवळपास महापालिकेच्या बसेस रस्त्यांवर धावत आहेत. मात्र , ज्या प्रमाणात नफा होणे अपेक्षित आहे , तो होत नसल्याने सध्या बससेवा तोट्यात सापडली आहे . नाशिक महापालिकेच्या तिजोरीत सध्या खडखडाट असताना बससेवा देखील तोट्यात सापडत आहे .  ही बाब लक्षात घेता महापालिका आयुक्तांनी याबाबत आढावा बैठक घेऊन चर्चा केली. ज्या मार्गावर अत्यंत कमी उत्पन्न मिळत आहे, अशा मार्गावरील बसेस बंद करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

नाशिक महापालिकेच्या वतीने शहर बससेवा सुरू करण्यात आली . ८ जुलै २०२१ रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ झाला होता. पहिल्या टप्प्यात ५० बसेस शहरातील रस्त्यावर धावत होत्या. दरम्यान, हळूहळू लॉकडाऊनची परिस्थिती दूर झाल्याने बसच्या संख्येमध्ये देखील वाढ करण्यात आली . उत्पन्नवाढीसाठी शासनाने दिलेल्या जाहिरात धोरणाचा देखील वापर करण्यात येणार असून, महापालिकेच्या बसेसवर येत्या काळामध्ये जाहिरात दिसून येणार आहे . पहिल्या सात महिन्यांत सुमारे पाच कोटी रुपयांच्या तोट्यात महापालिकेची बससेवा सुरू होती. मात्र, महापालिका ज्याप्रमाणे इतर सुविधा नाशिककरांना देते त्याच पद्धतीने बससेवा ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे ती तोट्यात गेली तरी सेवा सुरूच राहील . केवळ तोटा कमी कसा राहील , यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे . नाशिक शहरात महाराष्ट्र एसटी परिवहन महामंडळाने शहर बस चालवण्यात असमर्थता दर्शवल्यानंतर पालिकेने धुमधडाक्यात बससेवा सुरू केली होती . मात्र , आता सिटीलिक बसला देखील तोट्याचे ग्रहण लागल्याचे चित्र आहे . यावर उपाय म्हणून महापालिका प्रशासन आता कमी उत्पन्नाच्या मार्गावर धावणाऱ्या बसेस बंद करण्याची शक्यता आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *